
पूनम पोळ/मुंबई : अवघ्या जगाला हादरवून सोडणारा कोरोनाचा काळ असो वा देशातील किंवा राज्यातील आपत्कालीन परिस्थिती, तिवरे धरण दुर्घटना किंवा माळीण दुर्घटना, यावेळी शासन आणि प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून लोकांच्या मदतीसाठी जमेल तसे उभे राहण्याचा प्रयत्न मुंबईचा राजा गणेशगल्ली मंडळाने केला आहे. तसेच, सामाजिक बांधिलकी जपत असताना मुंबईचा राजा गणेशगल्ली मंडळाने नेहमीच सामाजिक कार्यात अग्रस्थान पटकावले असून त्यांच्याकडून वर्षभर विविध उपक्रमांची रेलचेल सुरू असते.
समाजातील शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘शिका आणि कमवा’ या संकल्पनेअंतर्गत मुलांना फोटोग्राफीचे प्रशिक्षण, टीव्ही रिपेअर, मोबाईल रिपेअर यांसारखे कोर्सेसचे प्रशिक्षण मंडळाकडून दिले जाते. तर विभागातील विद्यार्थ्यांसाठी संगणक क्लासेस सुरू करण्यात आले असून हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. तसेच बाहेर ४०-५० हजार रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना आवडीचे शिक्षण घेणे शक्य नसलेल्यांसाठी असे कोर्स मंडळाच्या वतीने मोफत शिकवण्यात येतात, अशी माहिती लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशगल्ली मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांनी दैनिक ‘नवशक्ति’शी बोलताना दिली.
सामाजातील प्रत्येकाने एकत्र यावे, या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळेपासून गणेशगल्लीचा राजा मनोकामना पूर्ण करणारा मुंबईचा राजा अशी ओळख निर्माण झाली. ९८ वर्षांपूर्वी एकत्रितपणा जोपासणे, हा उद्देश मनाशी बाळगून लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा अर्चा केली जाऊ लागली. ९७ वर्षांपूर्वीचे चित्र आज बदलले आहे, मात्र गणेशगल्ली अर्थात ‘मुंबईचा राजा’ आजही सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी गणेशोत्सव साजरा करत आहे. गणेशोत्सव काळातील १० दिवस धावपळीचे आणि प्रत्येक भाविकाला गणरायाचे दर्शन मिळवून देण्यासाठी मंडळातील प्रत्येक व्यक्ती धडपडत असतो. तर नवरात्रीनंतर खऱ्या सामाजिक कार्याला सुरुवात होते, अशी माहिती परब यांनी दिली.
लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने लालबागमध्ये सन १९२८ साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना पेरूची चाळ येथे करण्यात आली. प्रथम हा उत्सव फक्त पाच दिवस होत असे. भजन, किर्तने, भारूड इत्यादी कार्यक्रमांमधून जनजागृती केली जात असे. या उत्सवामागे व्यापारी वर्गाने गिरणगावातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचे फार मोठे कार्य केले. पुढे मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे बाजार मोठा झाला आणि हा उत्सव तेजुकाया मेन्शन येथे स्थलांतरित करण्यात आला. उत्सवाचे स्वरूप व त्याला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन, त्याचबरोबर वाढत्या लोकवस्तीचे प्रमाण विचारात घेऊन कै. अंबाजी मास्तर व काही तडफदार उत्साही कार्यकर्त्यांनी १९३७-३८ साली हा उत्सव गणेशगल्ली परिसरात आणला. त्याच काळात श्री गणेश उत्सव अकरा दिवस साजरा करण्यास सुरवात होऊन शारदामातेचा नवरात्रौत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. या उत्सवात वाडिया, चिंचपोकळी, काळाचौकी, करीरोड, जेरबाईरोड, मेघवाडीपासून संपूर्ण जुने लालबाग सहभागी होते. १९४२ साली या उत्सव कार्याला फार महत्त्व प्राप्त होऊन या उत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेच्या चळवळीचे देखावे श्रींच्या पुढे ठेवण्यात येऊ लागले आणि उत्सव हा लोक जागृतीचे केंद्रस्थान झाला. त्यावेळी प्रमुख्याने स्वातंत्र्य चळवळीची भाषणे, करमणुकीद्वारे मेळे, नाटके, पोवाडे, इत्यादी लोकशिक्षणाचे कार्यक्रम उत्सवाद्वारे लोकांपुढे ठेवण्यात येऊ लागले. १९४५ साली सुभाषचंद्र बोस ‘श्री’ रूपाने स्वराज्याचा सूर्य सात घोडयांचा देखावा स्थापून लोकांसमोर सादर करण्यात आला. त्यावर्षी लोकांचा प्रतिसाद पाहून ४५ दिवसांनी श्रींचे विसर्जन करण्यात आले, याचा मोठा बोलबाला संपूर्ण मुंबईमध्ये झाला होता. हा देखावा कै. राजापुरकर मूर्तीकार यांनी साकारला होता. सन १९४७ नंतर या उत्सवात स्वतंत्र भारत आणि विकास यांचे देखावे गणरायापुढे सादर करण्यात आले. महिलांवरील अत्याचार, मुली असुरक्षित, तरुण पिढी व्यसनाच्या आहारी यामुळे गेल्या काही वर्षांत मुंबईचे चित्र बदललेले आहे. या आणि अशा गंभीरविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपणारा संदेश देण्यात येईल, असेही परब यांनी सांगितले.
रक्तदान शिबिरापासून सामाजिक कार्याला सुरुवात
रक्तदान शिबिरापासून त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात होत असून दरवर्षी २००० हून अधिक रक्तदाते रक्तदान करतात आणि यामध्ये दरवर्षी रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. यानंतर दरवर्षी जानेवारी महिन्यात मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात येते आणि या शिबिरात राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक सहभाग घेत असतात. तर फेब्रुवारी महिन्यात या शिबिरादरम्यान आढळून आलेले मोतीबिंदूच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येते. हा सर्व खर्च गणेशोत्सव कालावधीत दानपेटीत जमा झालेल्या रकमेतून केला जातो, असेही परब यांनी सांगितले.