दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर वाजत गाजत, विधीवत पूजा करून आणि मोठ्या भक्तीभावाने विराजमान केलेल्या दीड दिवसाच्या बाप्पाला गुरुवारी थाटामाटात निरोप देण्यात आला.
दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन
Published on

मुंबई : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर वाजत गाजत, विधीवत पूजा करून आणि मोठ्या भक्तीभावाने विराजमान केलेल्या दीड दिवसाच्या बाप्पाला गुरुवारी थाटामाटात निरोप देण्यात आला. रात्री ९ वाजेपर्यंत शहर व उपनगरातील सार्वजनिक व घरगुती असे २९,९६५ गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलाव आणि समुद्र किनारे अशा ठिकाणी हे विसर्जन करण्यात आले आहे.

बुधवारी सर्वत्र थाटामाटात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. त्यामुळे दिवसभर मुंबईत उत्साहाचे वातावरण होते. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गुरूवारी दीड दिवसाच्या बाप्पाचे ढोलताशांच्या गजरात, टाळ मृदंग वाजवून विसर्जन करण्यात आले. विसर्जनस्थळी पालिकेने नियोजनबद्ध व्यवस्था केली होती.

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फोटो शेअर करा आणि जिंका मोठी बक्षिसे

पालिकेने विभागवार तयार केलेल्या कृत्रिम व नैसर्गिक तलावांत भाविकांनी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला. महापालिकेने विसर्जन स्थळी निर्माल्य कलश, समुद्र, खाडीच्या ठिकाणी विसर्जन करताना कोणीही समुद्रात बुडू नये यासाठी जीवरक्षक, मोटार बोट, नियंत्रण कक्ष, वैद्यकीय मदत, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. उंच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी २७५ ठिकाणी व्यवस्था कृत्रिम तलावांची करण्यात आली आहे. तसेच, विसर्जन स्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी समुद्रस्थळी विसर्जनासाठी जाताना जेली फिशचा वावर असल्याने काळजी घेण्याचे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे.

दिवसभरात विसर्जन केलेल्या मूर्ती (रात्री ९ वाजेपर्यंत)

सार्वजनिक - ३३७

घरगुती - २९,६१४

हरितालिका - १४

असे एकूण २९,९६५ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in