
मुंबई : काही महिन्यांवर येऊन ठेवलेला गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा याकरिता पालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे पीओपी मूर्तीवर यंदा बंदी असेल यावर मुंबई महापालिका ठाम आहे. शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईत आणण्यासाठी परवानगी दिली जाईल, असे पत्र मुंबई महापालिकेने पेण-पनवेल येथील मूर्तिकारांना पाठवून आवाहन केले आहे.
शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी महापालिकेकडून हवी तेवढी मोफत माती दिली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पालिका प्रशासनाने याबाबत येत्या गुरुवारी सर्व मूर्तिकारांच्या संघटनेसोबत बैठक आयोजित केली असल्याचे सांगण्यात आले.
गणेशोत्सवाला चार महिने शिल्लक असताना मुंबई पालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे. मूर्तिकारांना यंदाही शाडूची माती विनामूल्य दिली जाणार आहे. उत्सवादरम्यान मूर्तीचे आगमन, विसर्जन सुकर होईल एवढ्या उंचीची मूर्ती साकारण्यात यावी, अशी सूचक अट या परवानगीसाठी घालण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातून पेण-पनवेल येथून मोठ्या प्रमाणात मूर्ती मुंबईत आणल्या जातात. त्यामुळे येथील मूर्तिकारांना पर्यावरणपूरक मूर्ती बनवायच्या आहेत. पीओपीच्या मूर्तींना परवानगी दिली जाणार नाही, असे महिन्याभरापूर्वीच पालिकेने मूर्तिकारांच्या संघटनेला पत्राद्वारे सूचित केले आहे. गुरुवारी सर्व मूर्तिकार संघटनांसोबत पालिका प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पीओपीवर २०२० पासून बंदी
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर २०२० मध्ये बंदी घातली होती. मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. मात्र उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर यंदाच्या माघी गणेशोत्सवापासून १०० टक्के पीओपीबंदीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नये. ती झाली असल्यास त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने ३० जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले होते. भाद्रपदातील गणेशोत्सवातही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याच्या दृष्टीने पालिका कामाला लागली आहे.
पर्यावरणपूरक मूर्तीलाच परवानगी
गणेशोत्सवाआधीच फेब्रुवारी दरम्यान गणेश मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांकडून कामाला सुरुवात होते. मात्र यंदा पीओपी मूर्ती की शाडूच्या मूर्ती हा संभ्रम अद्याप असल्याने अनेक मूर्तिकारांनी कामाला सुरुवात केलेली नाही. एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप पेच काही सुटलेला नाही. मंडपाची परवानही घेताना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती असेल तरच परवानही दिली जाणार आहे. गुरुवारच्या बैठकीनंतर यावर मूर्तिकारांची भूमिका स्पष्ट होणार आहे.
शाडूच्या मातीचा मोफत पुरवठा
मूर्तिकारांना यंदाही विनामूल्य शाडूची माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रति परिमंडळ १०० टन म्हणजेच एकून सातशे टन माती अथवा मागणीप्रमाणे आवश्यक तेवढी शाडू माती विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. वाढीव मागणी असल्यास आणखी माती खरेदी केली जाणार आहे.