Mumbai : गणेशोत्सवात २ लाख मूर्तीचे विसर्जन; कृत्रिम तलावांना मुंबईकरांची पसंती

मुंबईतील समुद्रकिनारे (चौपाटी), नैसर्गिक स्थळे तसेच विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले कृत्रिम तलाव येथे श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेले सर्वंकष नियोजन, मुंबई पोलीस दलासह विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांचे सहकार्य, तसेच सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळे, उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाचा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.
Mumbai : गणेशोत्सवात २ लाख मूर्तीचे विसर्जन; कृत्रिम तलावांना मुंबईकरांची पसंती
Mumbai : गणेशोत्सवात २ लाख मूर्तीचे विसर्जन; कृत्रिम तलावांना मुंबईकरांची पसंती
Published on: 

मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे (चौपाटी), नैसर्गिक स्थळे तसेच विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले कृत्रिम तलाव येथे श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेले सर्वंकष नियोजन, मुंबई पोलीस दलासह विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांचे सहकार्य, तसेच सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळे, उत्स्फूर्त सहभाग यामुळे श्रीगणेश भक्त आणि नागरिकांचा बृहन्मुंबईतील यंदाचा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.

मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांच्या संकल्पनेतून यंदा 'एक गणपती, एक झाड' हा उपक्रम राबविण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत विसर्जित होणाऱ्या श्रीगणेशमूर्तीच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, या माध्यमातून श्रीगणेशोत्सवाला वृक्षसंवर्धनाची जोड देण्यात आली आहे.

पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी मूर्तिकारांना ९४० मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती मोफत वितरित करण्यात आली. तसेच यंदा २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले.

मुंबईकरांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला दिलेल्या प्रतिसादाचे फलित म्हणून यंदाही कृत्रिम तलावांमध्ये श्रीगणेशमूर्ती विसर्जनाला प्राधान्य देण्यात आले. मुंबईत ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि २७८ ठिकाणी ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, ६ फूट उंचीपर्यंतच्या श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

यंदाच्या श्रीगणेशोत्सवात शनिवार २६ सप्टेंबरपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण १ लाख ९९ हजार १८५ श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये दीड दिवस, पाच दिवस, सहा दिवस (गौरी गणपती) आणि सात दिवसांच्या उत्सवातील श्रीगणेशमूर्तीचा समावेश आहे.

२५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत

श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महानगरपालिकेचे २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत होते. विविध विसर्जनस्थळी १ हजार १९४ स्टील प्लेट, २३ जर्मन तराफे, ३४ क्रेन, ८५ रुग्णवाहिका आणि १० मोटरबोटी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या सुरक्षेसाठी १ हजार १३२ जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. रात्रीच्या विसर्जनासाठी ६ हजार ५२ फ्लडलाइट व सर्चलाइटची व्यवस्था करण्यात आली होती.

गर्दी व्यवस्थापन, नागरिकांना मार्गदर्शन आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वयासाठी २६१ स्वागत कक्ष, २२८ नियंत्रण कक्ष आणि ७५ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले होते. भाविकांच्या सुविधेसाठी ४८९ तात्पुरती प्रसाधनगृहे तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

९३४ मेट्रिक टन निर्माल्य संकलित

मुंबईतील श्रीगणेशोत्सवादरम्यान निर्माल्यांचे संकलन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. सार्वजनिक मंडळांकडून योग्यप्रकारे निर्माल्य संकलित केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. मुंबईतील विविध विसर्जनस्थळी एकूण ६१३ निर्माल्य कलश आणि ८३८ निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्या माध्यमातून २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण ९३४.२६ मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.

एकूण विसर्जित श्रीगणेशमूर्ती

सार्वजनिक – १० हजार ४२१

घरगुती – १ लाख ८२ हजार ०२९

गौरी / हरतालिका - ६ हजार ७३५

एकूण - १ लाख ९९ हजार १८५

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in