

मुंबई : लाखो भाविक ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या गणेशोत्सवाला मोठ्या थाटामाटात सुरुवात होत आहे. लाडक्या बाप्पाची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
श्री गणेशाच्या पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी रविवारी मुंबईतील विविध बाजारपेठांमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. मूर्ती प्रतिष्ठापना आणि सजावटीची अंतिम तयारी करण्यासाठी पूजा साहित्य, फुले, हार, मखरे, रोषणाई, विद्युत सजावट, तोरणे आणि विविध पूजावस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्या.
भुलेश्वर, दादर, लालबाग, परळ, घाटकोपर, अंधेरी, बोरीवली, मुलुंड आणि कुर्ला येथील बाजारपेठा दिवसभर गजबजलेल्या होत्या. फुले, दुर्वा, नारळ, सुपारी, अगरबत्ती, कापूर, हळद-कुंकू, आरास साहित्य तसेच पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूंना यंदा विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गणेशभक्तांनी कुटुंबासह बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.
बाजारातील दर
कंठी हारांची किंमत, गुणवत्तेनुसार व डिझाईननुसार बदलते
साधे कृत्रिम कंठी हार : ५० ते १५० रुपये
मोती व मणींचे हार : २०० ते ४०० रुपये
रुद्राक्ष व खास डिझाईनचे हार : ७०० ते १८०० रुपये
चांदीच्या माळा : ३००० ते ६००० रुपये
बाप्पाच्या कानात घालण्यासाठी बुगडी : १५०
कंठी हार खरेदीसाठी लगबग
गणेश मूर्तीसाठी लागणाऱ्या विविध अलंकारांनी बाजार सजले आहेत. गणेशोत्सवात कंठी हाराला विशेष मागणी असते. मोती, गोल्ड डायमंड असे विविध आकर्षक डिझाईनमधील कंठी हार खरेदीसाठी भुलेश्वर येथील बाजारात भक्तांची झुंबड उडाली होती. अगदी ४० रुपये ते ४५० रुपयांपर्यंत अडीच ते तीन फुटांपर्यंत आकर्षक कंठी हार बाजारात उपलब्ध आहेत.