

तेजस वाघमारे/मुंबई
राज्याच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपतीच्या आगमनासाठी भाविक आतुर झाले आहेत. तर गणेशोत्सवाच्या आगमन आणि विसर्जनाच्या तयारीला मुंबई महानगरपालिका आणि पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. गणेशोत्सव काळात वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण आणि भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयांमधील सुमारे दीड हजार राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला धावून येणार आहेत.
मुंबईतील प्रमुख गणेश मंडळे, विसर्जन मार्ग, रेल्वे स्थानके तसेच गर्दीची शक्यता असलेल्या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविकांची वर्दळ असते. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच नामांकित गणेश मंडळाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळते. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी मुंबई विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयांमधील सुमारे दीड हजार एनएसएसचे विद्यार्थी पोलिसांना मदत करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
गणेशमूर्तींच्या दर्शनासाठी आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी होणारी गर्दी नियंत्रित करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. या पार्श्वभूमीवर एनएसएस स्वयंसेवकांची मदत पोलिसांना मिळणार आहे. या विद्यार्थांना गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य, भाविकांना योग्य मार्गदर्शन, रांगा व्यवस्थित ठेवणे अशी विविध जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. पोलिसांच्या सूचनांनुसार स्वयंसेवक काम करणार असल्याने उत्सव काळातील व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यास मदत होणार आहे.
असे करतील काम
गणेशोत्सव काळात दरवर्षी एनएसएसचे विद्यार्थी आपले योगदान देत आहेत. यंदाही सुमारे दीड हजार विद्यार्थी प्रमुख गणेश मंडळे, विसर्जन मार्ग, रेल्वे स्थानके तसेच गर्दीची शक्यता असलेल्या परिसरात भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. गणेश मूर्तीचे विसर्जन व्यवस्थित न झाल्यास हे विद्यार्थी पुन्हा मूर्तीचे विसर्जन करण्याचे काम करतात. पोलिसांसोबत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही हे विद्यार्थी असतात, असे राष्ट्रीय सेवा योजना मुंबई विद्यापीठ विशेष कार्य अधिकारी सुशील शिंदे यांनी सांगितले.