गणेशोत्सवात मुक्या प्राण्यांनाही स्थान; मुंबईतील मंडळांचा प्राणिप्रेमाचा उपक्रम

शहरातील काही प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्राण्यांच्या कल्याणाचा संदेश देत आपले मंडप 'पेट-फ्रेंडली' (प्राण्यांसाठी अनुकूल) केले आहेत. भटक्या प्राण्यांनाही या उत्सवाचा भाग करून घेत मंडळ कार्यकर्त्यांनी उत्सवाचा आनंद द्विगुणित केला आहे.
गणेशोत्सवात मुक्या प्राण्यांनाही स्थान; मुंबईतील मंडळांचा प्राणिप्रेमाचा उपक्रम
गणेशोत्सवात मुक्या प्राण्यांनाही स्थान; मुंबईतील मंडळांचा प्राणिप्रेमाचा उपक्रम'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

धैर्य गजारा/ मुंबई

ढोल-ताशांचा गजर आणि बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता यातच यंदा मुंबईतील गणेशोत्सवाला एक संवेदनशील आणि सामाजिक वळण मिळाले आहे. शहरातील काही प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्राण्यांच्या कल्याणाचा संदेश देत आपले मंडप 'पेट-फ्रेंडली' (प्राण्यांसाठी अनुकूल) केले आहेत. भटक्या प्राण्यांनाही या उत्सवाचा भाग करून घेत मंडळ कार्यकर्त्यांनी उत्सवाचा आनंद द्विगुणित केला आहे.

दरवर्षी भव्य देखावे आणि सामाजिक संदेशांसाठी प्रसिद्ध असलेली मुंबईतील गणेशोत्सव मंडळे यंदा मुक्या प्राण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहेत. भाविकांना आपल्या पाळीव प्राण्यांना दर्शनासाठी एकत्र आणण्याचे आवाहन केले जात असून प्राण्यांसाठी विशेष महाआरती व मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे.

कफ परेडमध्ये ‘कालभैरव’बरोबर काळा श्वान

कफ परेड येथील 'कुलाबा संक्रमण शिबिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' (मुंबईचा कृपाळू) यंदा आपले ४४ वे वर्ष साजरे करत आहे. या वर्षी मंडळात भगवान शिवाचे रूप असलेल्या 'कालभैरव' रूपातील गणपतीची भव्य मूर्ती साकारण्यात आली असून त्यांच्यासोबत काळा श्वान आहे. उत्सव काळात मंडपातील कोणत्याही भटक्या प्राण्याला हाकलले जाणार नाही, उलट त्यांना अन्न-पाणी दिले जाईल आणि पाळीव प्राण्यांसह त्यांच्या मालकांसाठी महाआरतीचे आयोजन केले जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

'आमचा मंडप झोपडपट्टी भागात आहे. यंदा कालभैरव रूपातील मूर्तीच्या माध्यमातून प्राणिमायेचा संदेश दिला जात आहे. ११ दिवस भटक्या प्राण्यांना मंडपात आश्रय दिला जाईल, असे मंडळाचे अध्यक्ष अमित सावंत म्हणाले.

कांदिवलीत भटक्या श्वानांसाठी उपक्रम

कांदिवली येथील 'कांदिवलीचा अधिपती' या मंडळाने 'जीववन वेल्फेअर फाऊंडेशन' या संस्थेच्या सहकार्याने प्राण्यांवरील अत्याचार, वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी, प्लास्टिक प्रदूषण आणि निसर्गाचा ऱ्हास या विषयांवर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. विसर्जन होईपर्यंत भटक्या श्वानांना दिवसातून दोनदा अन्न देणे, रेबीजविरोधी लसीकरण करणे आणि सुमारे १,५०० भटक्या श्वानांच्या गळ्यात रेडियम पट्टे बांधण्याचा संकल्प केला आहे. 'गणपती बाप्पा स्वतः प्राण्यांचे शीर धारण करून निसर्ग आणि मानवाच्या सहअस्तित्वाचा संदेश देतात. प्राण्यांचा हक्क हिरावून घेऊ नये यासाठी प्राणिमात्रांवरील अत्याचाराविरोधातील कायद्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहोत,' असे मंडळाचे कार्यकर्ते भूषण तायडे यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in