गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवण्याची मागणी

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली असून गणेशोत्सवात उंच सुबक गणेशमूर्तींचे भक्तांना आकर्षण असते. मुंबईत सार्वजनिक गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील भक्त येत असल्याने रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सेवा सुरू ठेवण्यासाठी रेल्वे व मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवण्याची मागणी
Published on

मुंबई : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली असून गणेशोत्सवात उंच सुबक गणेशमूर्तींचे भक्तांना आकर्षण असते. मुंबईत सार्वजनिक गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील भक्त येत असल्याने रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सेवा सुरू ठेवण्यासाठी रेल्वे व मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. महापालिकेच्या ग्रँट रोड येथील डी विभाग कार्यालयात आयोजित जनता दरबारात जनतेचे केलेल्या मागणीनंतर ते बोलत होते.

गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त मुंबई परिसरात दाखल होतात. या स्थितीत भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी पत्र व्यवहार सुरू असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी जनता दरबारात दिली. प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती. या सूचनेला अनुसरूनच या जनता दरबाराचे आयोजन केल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. गेल्या महिनाभरात दक्षिण मुंबईत झालेल्या पाच जनता दरबारात ऑनलाइन आणि ऑफलाइन मिळून सुमारे दोन हजार नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या.

नागरी समस्या सोडवण्यासाठी बारा विभागांचे अधिकारी एकाच छताखाली आणण्यात आल्याचे लोढा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in