गणेशोत्सव मंडळांना चार दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपकाला परवानगी; बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीची माहिती

यंदा गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक लावण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
गणेशोत्सव मंडळांना चार दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपकाला परवानगी; बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीची माहिती
Published on

मुंबई : यंदा गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक लावण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या चार दिवसांमध्ये दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवसांचा समावेश आहे, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीने दिली आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने दिलेल्या माहितीनुसार, यंदा जिल्हाधिकाऱ्याने चुकीने १ सप्टेंबर हा दिवस मंजूर केलेला होता. मात्र, समितीच्या पाठपुराव्यानंतर पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास बाब आणून दुरुस्ती करण्यात आली असून आता योग्य त्या दिवशी परवानगी देण्यात आली आहे. सन २०१३ नंतर या दिवसांत कोणतीही वाढ झालेली नाही. समितीकडून प्रत्येक वर्षी शासनाकडे अधिक दिवस मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शासनाने मंजूर केलेल्या १५ दिवसांपैकी अजूनही दोन दिवस शिल्लक आहेत. त्यापैकी एक दिवस पोलीस विभागाला देण्यात यावा व उर्वरित एक दिवस गणेश मंडळांना स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी रात्री १२ वाजेपर्यंत वापरण्याची परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी स्पष्ट केले.

बुधवारी लाडक्या बाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले. त्यामुळे मुंबईतील गल्लीबोळात सध्या भक्तिमय वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा आणखी एक दिवस उशीरापर्यंत ध्वनीक्षेपक लावण्यास परवानगी देण्याची मागणी होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in