Mumbai : विसर्जित मूर्तीच्या माती-पाण्यातून रोपांना संजीवनी; 'एक गणपती, एक झाड' उपक्रमाची सुरुवात

अनंत चतुर्दशीनंतर आता मुंबईत 'एक गणपती, एक झाड' या उपक्रमाची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विसर्जित शाडूच्या गणेशमूर्तीची माती आणि पाण्याचा वापर करून वृक्षलागवड करण्याचा संदेश देत महापौर रितू तावडे यांनी शनिवारी (२६ सप्टेंबर) महापौर निवासस्थानी स्वतः रोपांची लागवड केली.
Mumbai : विसर्जित मूर्तीच्या माती-पाण्यातून रोपांना संजीवनी; 'एक गणपती, एक झाड' उपक्रमाची सुरुवात
Mumbai : विसर्जित मूर्तीच्या माती-पाण्यातून रोपांना संजीवनी; 'एक गणपती, एक झाड' उपक्रमाची सुरुवात
Published on: 

मुंबई : अनंत चतुर्दशीनंतर आता मुंबईत 'एक गणपती, एक झाड' या उपक्रमाची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विसर्जित शाडूच्या गणेशमूर्तीची माती आणि पाण्याचा वापर करून वृक्षलागवड करण्याचा संदेश देत महापौर रितू तावडे यांनी शनिवारी (२६ सप्टेंबर) महापौर निवासस्थानी स्वतः रोपांची लागवड केली.

भायखळा येथील महापौर निवासस्थानी दीड दिवसांच्या शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीचे कृत्रिम जलकुंभात विसर्जन करण्यात आले होते. विसर्जनानंतर संकलित झालेली शाडूची माती आणि पाणी यांचा वापर महापौर बंगल्याच्या उद्यानात रोपलागवडीसाठी करण्यात आला. महापौर तावडे यांच्या हस्ते तुळस आणि सूर्यफुलाच्या रोपांची लागवड करण्यात आली.

गणेशोत्सवाला यंदाच्या पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यासाठी मुंबई महापालिकेने विसर्जित गणेशमूर्तीच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. अनंत चतुर्दशीनंतर या मोहिमेला आता वेग देण्यात येणार आहे. घरच्या घरी शाडूच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन केलेल्या नागरिकांनीही उर्वरित मातीचा वापर कुंड्या किंवा बागांमध्ये रोपे लावण्यासाठी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

किमान एका रोपाची लागवड करावी

'बाप्पा मातीतून आकाराला येतो आणि पुन्हा निसर्गातच विलीन होतो. विसर्जनानंतरची ही पवित्र माती आणि जल नवीन रोपांना संजीवनी देईल. त्यामुळे वर्षभर निसर्गाच्या पाना-फुलांतून आणि सावलीतून बाप्पाचा आशीर्वाद आपल्यासोबत राहील. शब्दांपेक्षा कृतीतून दिलेला संदेश अधिक प्रभावी असतो. म्हणूनच स्वतः पासून या उपक्रमाची सुरुवात केली,' असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. मुंबईतील प्रत्येक नागरिक, इमारती, वसाहती, संकुले तसेच गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमाचे अनुकरण करून किमान एका रोपाची लागवड करावी आणि त्याचे संगोपन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

समुद्रकिनारे, चौपाट्यांचे प्रदूषण रोखण्यावर भर!

गणेशमूर्ती विसर्जनामुळे समुद्रकिनारे, चौपाट्या आणि नैसर्गिक तलावांचे प्रदूषण होऊ नये यासाठी महापालिकेने यंदा विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था केली होती. नागरिकांनी या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. आता विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे. 'एक गणपती, एक झाड' या संकल्पनेतून गणेशोत्सवाची सांगता केवळ विसर्जनाने न होता, नव्या रोपाच्या लागवडीने व्हावी, असा संदेश महापालिकेकडून देण्यात येत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in