मोठ्या मंडळांच्या बाप्पांचे वाजत गाजत आगमन! 'चिंतामणी', 'परळचा राजा' जल्लोषात विराजमान; लालबाग-चिंचपोकळीतील रस्ते भाविकांनी फुलले

लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. शनिवार व रविवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाचे आगमन होत असून शनिवारी चिंचपोकळीचा 'चिंतामणी', 'परळचा राजा', 'अंधेरीचा महाराजा' अशा ६० हून अधिक मोठ्या बाप्पांचे आगमन वाजत गाजत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत झाले.
मोठ्या मंडळांच्या बाप्पांचे वाजत गाजत आगमन! 'चिंतामणी', 'परळचा राजा' जल्लोषात विराजमान; लालबाग-चिंचपोकळीतील रस्ते भाविकांनी फुलले
Published on

मुंबई : लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. शनिवार व रविवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाचे आगमन होत असून शनिवारी चिंचपोकळीचा 'चिंतामणी', 'परळचा राजा', 'अंधेरीचा महाराजा' अशा ६० हून अधिक मोठ्या बाप्पांचे आगमन वाजत गाजत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत झाले.

चिंचपोकळीच्या 'चिंतामणी'चे आणि 'परळचा राजा' चे हजारो भाविक आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोषात स्वागत करत मंडपाकडे आगमन झाले. हा आगमन सोहळा पाहण्यासाठी मुंबई तसेच मुंबईबाहेरील भाविकांनी अलोट गर्दी केली होती. त्यामुळे परळ, लालबाग, भोईवाडा, करी रोड, चिंचपोकळी ते कॉटन ग्रीनपर्यंतचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

दुपारी आगमन मिरवणूक निघाली तेव्हा मोठी गर्दी झाली. मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेश भक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी या ठिकाणी लाखो भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचत असतो. यंदाही मोठी गर्दी केली होती. चिंचपोकळीचा चिंतामणी राजा गणेशोत्सव मंडळाचे हे १०७ वे वर्ष आहे. यावेळी सभोवतालच्या सजावटीत विष्णूचा अवतार श्री बालाजी देवस्थान येथील संकल्पनेनुसार गरूड, कीर्तिमुख, शंख, चक्र, कर्पूर-युक्त नामम् (टिळा) इत्यादी वैशिष्ट्यांसह चिंतामणी गणपती स्थानापन्न होत आहे.

तिरुपती बालाजी मंदिरासह हैदराबाद येथील श्री वेंकटेश्व मंदिर (स्वर्णगिरी), भुवनगिरी येथील मंदिराच्या स्थापत्य व वास्तुरचनेचीही प्रतिकृती येथे वेगवेगळ्या आकर्षक पद्धतीने उभारण्यात येणार आहे. गोपुरम दीपस्तंभ, पौराणिक कथांमध्ये असणारे व दाक्षिणात्य मंदिरांमध्ये बहुतांश आढळणारे याली किंवा व्याला (सिंह, हत्ती व घोड्याचे मिश्रण असलेला रक्षक प्राणी) आदी अनेक रचना येथील मंडप व अन्य सजावटीत उभारण्यात येणार असल्याचे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र डिचोलकर यांनी सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in