

मुंबई : मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळखला जाणारा गणेश गल्लीच्या बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर बाप्पाचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली. तर मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची मनोभावे पूजा केल्यानंतर शुक्रवारी वाजतगाजत मिरवणूक निघाली. कोळी बांधवांनी पुजा अर्चा केली आणि ढोल ताशांचा गजर, फुलं, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या दिमाखात लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघाली. बाप्पाची एक झलक डोळ्यात सामावून घेण्यासाठी लाखो भक्तांचा जनसागर रस्तोरस्ती व गिरगाव चौपाटीवर उसळला होता. दरम्यान, मुंबईत १२ दिवसांच्या हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन निर्विघ्न पार पडले.
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी तीन ते चार महिने आधीपासून भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. दरवर्षी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात भक्त मुंबईत येत असतात. भल्यामोठ्या उंच मूर्ती, आकर्षक देखावे भक्तांसाठी पर्वणी ठरते. हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्री गणेशाची यंदा १४ सप्पटेंबर रोजी घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत प्रतिष्ठापना करण्यात आली.
मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून दोन लाखांहून अधिक घराघरात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते. १० दिवस बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करण्यात येते. मात्र बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते त्यावेळी भक्तांचे अश्रू अनावर होतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी ही मुंबईत मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत व विसर्जन पार पडले. १४ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थात दीड दिवसांच्या बाप्पाला आंनदाश्रुने निरोप देण्यात येतो. दीड दिवसांचे बाप्पा, पाच दिवसांचे बाप्पा, सात दिवसांच्या बाप्पासह गौरींचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. गेले १२ दिवस मुंबईतील वातावरण भक्तिमय झाले होते.
शुक्रवारी २५ सप्टेंबरला सकाळपासून १० दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघी मुंबापुरी रस्त्यावर उतरली होती. मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या गणेश गल्लीतील बाप्पाची मिरवणूक निघाल्यानंतर लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली. १२ दिवसांत लालबागच्या राजाचे दर्शन घेणे शक्य झाले नाही, त्यांनी लालबागच्या राजाची सुबक आकर्षक उंच गणेशमूर्तीची एक झलक डोळ्यात सामावून घेण्यासाठी तसेच लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या क्षणाची एक झलक कॅमेरात कैद करण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी उसळली होती.