

मुंबई : दादर येथे शुक्रवारी संध्याकाळी महानगर गॅस लिमिटेडच्या पाईपलाइनला गळती लागली. यामुळे परिसरात घबराट पसरली होती. प्रशासनाने तातडीने आजूबाजूचा परिसर सुरक्षिततेच्या कारणास्तव सील केला. या घटनेत आग लागली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दादर (प.) येथील गोखले रोडवरील सखाराम कृष्ण मार्ग, अमर हिंद मंडळाच्या समोर आणि अनुग्रह हॉटेलजवळ असलेल्या महानगर गॅस लिमिटेडच्या पाईपलाइनमधून संध्याकाळी ६.०१ च्या सुमारास ही गळती सुरू झाल्याचे समोर आले.
पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब झालेल्या पाईपलाइनमधून गॅस वेगाने बाहेर पडत होता. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा आणि लोकवस्तीचा असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महानगर गॅस लिमिटेडचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तात्काळ त्या भागात जाण्यास निर्बंध घातले. गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन पथके काम करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आपत्कालीन यंत्रणांच्या तत्परतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्यापासून रोखण्यात यश आले.
जेसीबीचा धक्का लागल्याने दुर्घटना
महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, दादर गोखले रोडवरील मेजवानी रेस्टॉरंटजवळ एका कंपनीकडून खोदकाम सुरू असताना जेसीबी मशीनचा धक्का लागल्याने शुक्रवारी संध्याकाळी ही गॅस पाईपलाईन फुटली. खबरदारीचा उपाय म्हणून एमजीएलने दुरुस्तीचे काम सुलभ होण्यासाठी परिसरातील गॅस पुरवठा तात्पुरता खंडित केला आहे. या तात्पुरत्या खंडित पुरवठ्याबाबत संबंधित ग्राहकांना पूर्वकल्पना दिली जात असून, ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने खेद व्यक्त केला आहे.