नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज! हजारोंचा फौजफाटा तैनात

दारु पिऊन वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे, महिलांची छेड काढणे, अमली पदार्थ सेवण करणे, जवळ बाळगणे, खरेदी-विक्री करणे, अशा व्यक्तींची कोणतीही गय केली जाणार नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

नवीन वर्ष अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांकडून कायदा आणि सु-व्यवस्था राखण्यासाठी 2, 000 हून अधिक अधिकारी आणि सुमारे 13, 000 कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. यात 22 पोलीस उप आयुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त, 2051 पोलीस अधिकारी, 11500 पोलीस अंमलदार तसेच एसआरपीएफ प्लाटून , क्यूआरटी टीम, आरसीपी, यांचा समावेश असणार आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन न करता नववर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

31 डिसेंबर या दिवशी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी गस्त घालून सुरक्षेच्या दृष्टीकोणातून ठिकठिकाणी चौक्या उभारल्या जाणार आहेत. हिट-अँड-ड्राइव्हच्या घटना रोखणे आणि वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

दारु पिऊन वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे, महिलांची छेड काढणे, अमली पदार्थ सेवण करणे, जवळ बाळगणे, खरेदी-विक्री करणे, अशा व्यक्तींची कोणतीही गय केली जाणार नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

सत्यनारायण चौधरी, पोलीस सह आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था मुंबई यांनी सांगितले की, "31 डिसेंबरसाठी आम्ही मुंबईत विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली असून महत्वाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासाठी 2, 000 हून अधिक पोलीस अधिकारी आणि सुमारे 13, 000 पोलीस तैनात केले जाणार आहेत. याच बरोबर शहरातील महत्वाची ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवली जाणार आहेत." तसेच, सरकारी आदेश किंवा मुंबई पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची विनंती त्यांनी हॉटेल मालकांना तसेच नागरिकांना केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in