मुंबईत नवी सुरुवात करण्याचे स्वप्न भंगले! घाटकोपर दरडीत शेख कुटुंबाचा करुण मृत्यू, चार दिवसांपूर्वीच मुंबईत आलेले कुटुंब उद्ध्वस्त

चांगले भविष्य आणि मुलांना सुरक्षित आयुष्य मिळावे, या आशेने अवघ्या चार दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या एका कुटुंबाचे स्वप्न घाटकोपरमधील दरड दुर्घटनेने क्षणात उद्ध्वस्त केले. घाटकोपर पश्चिमेकडील अशोकनगर परिसरात दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
मुंबईत नवी सुरुवात करण्याचे स्वप्न भंगले! घाटकोपर दरडीत शेख कुटुंबाचा करुण मृत्यू, चार दिवसांपूर्वीच मुंबईत आलेले कुटुंब उद्ध्वस्त
Published on

मुंबई : चांगले भविष्य आणि मुलांना सुरक्षित आयुष्य मिळावे, या आशेने अवघ्या चार दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या एका कुटुंबाचे स्वप्न घाटकोपरमधील दरड दुर्घटनेने क्षणात उद्ध्वस्त केले. घाटकोपर पश्चिमेकडील अशोकनगर परिसरात दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अरिफ शेख, त्यांची पत्नी मरजिना आणि त्यांची दोन चिमुकली मुले मन्नत व अबान यांचा समावेश आहे.

मूळचे जौनपूर येथील असलेले अरिफ शेख हे व्यवसायाने शिंपी होते. मुंबईत काम मिळवून कुटुंबाला चांगले जीवन देण्याच्या उद्देशाने ते पत्नी आणि दोन मुलांसह अशोकनगर येथे राहण्यासाठी आले होते. त्यांची बहीण यापूर्वीपासून याच परिसरात राहत होती. त्यामुळे मुंबईत नव्याने संसार थाटताना कुटुंबाला आधार मिळेल, अशी अपेक्षा होती.

अरिफ यांना मुंबईत काम मिळेल आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल, असा विश्वास होता. मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली होती. त्यांच्या पत्नी मरजिनाही पतीला आर्थिक हातभार लागावा यासाठी घरकामासोबत मिळेल ते छोटे-मोठे काम करण्याच्या विचारात होत्या. मात्र, मुंबईत दाखल झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला.

वडिलांचा आक्रोश; राजावाडी रुग्णालयात शोककळा

दरड दुर्घटनेत मुलगा, सून आणि दोन नातवंडे गमावल्याने अरिफ यांचे टिटवाळा येथे राहणारे वडील दुःखाने कोलमडून गेले. राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात मुलाच्या कुटुंबीयांचे मृतदेह पाहून त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. काही दिवसांपूर्वीच नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी मुंबईत आलेल्या कुटुंबावर अशी दुर्दैवी वेळ येईल, याची कल्पनाही नातेवाईकांना नव्हती. मुलांच्या भविष्यासाठी मुंबईत आलेल्या या कुटुंबाचे स्वप्न एका क्षणात मातीखाली गाडले गेले. नव्या आयुष्याची आशा घेऊन मुंबईत आलेल्या या कुटुंबाचा प्रवास अवघ्या चार दिवसांतच नियतीने संपवला.

अरिफचा मृतदेह जौनपूरला नेणार

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अरिफ शेख यांच्या कुटुंबीयांनी चौघांचेही मृतदेह त्यांच्या मूळ गावी जौनपूर, उत्तर प्रदेश येथे नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार मृतदेह गावी पाठवण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घाटकोपर पोलिसांकडून कुटुंबीयांना मदत केली जात आहे.

धोकादायक ५० घरे रिकामी

घाटकोपर पश्चिमेकडील अशोकनगर परिसरात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलासह इतर यंत्रणांना बचावकार्यात मदत केली. या दुर्घटनेत आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना विविध सरकारी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पाहणीदरम्यान परिसरातील काही घरे धोकादायक क्षेत्रात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सुमारे ५० घरे रिकामी करून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. बाधित कुटुंबांची महापालिकेने केलेल्या निवासव्यवस्थेत किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या घरी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in