मुंबई : घाटकोपर येथील के. व्ही. के. सार्वजनिक शाळा आणि ज्युनियर कॉलेज या खासगी शाळेमध्ये मधल्या सुट्टीत शाळेच्या उपहारगृहातील समोसा खाल्ल्याने १५ हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांवर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून इकरा जाफर मियांज सैय्यद (वय ११) आणि वैजा गुलाम हुसेन (वय १०) या दोघींवर उपचार सुरू असून यांची प्रकृती स्थिर आहे. तर अन्य तिघांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील श्रेयस सिनेमाजवळ असलेल्या के. व्ही. के. या खासगी शाळेत सकाळच्या सत्रात इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग भरतात. सोमवारी सकाळच्या सत्रातील मधली सुट्टी झाल्यानंतर जवळपास १५ ते १६ विद्यार्थ्यांनी शाळेच्या उपहारगृहातील समोसा खाल्ला. त्यानंतर ५ विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. तसेच पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे शिक्षकांनी शाळेनजीक असलेल्या महानगरपालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांना बोलवले व त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. यादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या पालकांनाही शाळेत बोलवून घेत पाच विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. तर काही पालकांनी त्यांची मुले घेऊन खासगी रुग्णालयात उपचारांसाठी गेले.
यातील विषबाधा झालेल्या पाच मुलांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असून इकरा जाफर मियांज सैय्यद आणि वैजा गुलाम हुसेन या दोघींवर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर राजिक खान (वय ११), आरुष खान (वय ११), आणि अफजल शेख (वय ११) यांच्यावर उपचार करून सोडण्यात आले आहे. तर या शाळेत हा प्रकार दुसऱ्यांदा घडल्याने पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. या घटनेनंतर पोलिसांशी शाळेतील उपहारगृहाची पाहणी केली, तसेच काही खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करत ते वैद्यकीय परीक्षणासाठी पाठवले आहेत.