

मुंबई : दिवाळीच्या सुट्टीसाठी दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे घाटकोपरमधील एका खासगी शिकवणीच्या शिक्षिकेने १३ वर्षीय विद्यार्थिनीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २५ ऑक्टोबर रोजी घाटकोपर (पश्चिम) येथील गुरुनानक नगर परिसरातील खासगी शिकवणी 'खडका क्लासेस'मध्ये घडला.
लक्ष्मी दीपक खडका असे आरोपी शिक्षिकेचे नाव असून त्यांनी इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला वर्गात लाकडी छडीने मारहाण केली, ज्यामुळे तिच्या हातावर जखमा झाल्या, असे मिड-डेने पोलिसांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. घरी परतल्यावर मुलीच्या हातावर लाल डाग वडिलांनी बघितले. त्यांनी चौकशी केली असता मुलीने घडला प्रकार सांगितला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या वडिलांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
शिक्षिकेला नोटीस, लवकरच चौकशीसाठी बोलावणार
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कलम धोकादायक शस्त्रास्त्र किंवा साधनांच्या साहाय्याने एखाद्याला दुखापत केल्यास लागू होते. तसेच बालकांच्या काळजी व संरक्षण कायदा, २०१५ च्या कलम ७५ अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये मुलांच्या काळजी वा देखरेखीची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीने क्रूरता केल्यास शिक्षा होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी सांगितले की, “शिक्षिकेला कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत नोटीस देण्यात आली असून तिला चौकशीसाठी लवकरच बोलावले जाणार आहे. पीडित मुलीचा जबाब नोंदवला असून वर्गात उपस्थित इतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचेही जबाब घेतले जात आहेत,” असे त्यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत मुलीला लाकडी छडीने हातावर दोन वेळा मारण्यात आले असून त्यामुळे हातावर खोल निशाण आणि जखम झाल्याचे समोर आले आहे.