Mumbai : घरी परतण्यास नकार दिल्यामुळे पत्नीवर जीवघेणा हल्ला; नंतर स्वतःवरही केले वार
मुंबई : पत्नीवर ब्लेडने हल्ला करून पतीने स्वत:लाही दुखापत केल्याची घटना गिरगाव येथे परिसरात घडली. शीतल सुधाकर चव्हाण ऊर्फ शीतल बेलोसे असे या महिलेचे नाव असून तिच्या मानेवर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. पतीने त्याच ब्लेडने स्वत:वरही वार केल्याने त्याच्या मनगटाला दुखापत झाली. या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी आरोपी पती सागर बेलोसे याच्याविरुद्ध व्ही. पी. रोड पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजता गिरगाव येथील खाडिलकर मार्गावर घडली. शीतल आणि सागर यांचा १२ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक १० वर्षांचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात सतत खटके उडत होते. त्यामुळे शीतल ही तिच्या माहेरी निघून आली होती. ती गिरगाव येथील पत्रिका बनविण्याच्या कंपनीत कामाला होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचे लग्न झाले होते, मात्र नवऱ्याचे लग्नाबाहेर अफेअर असल्याची पत्नीला शंका होती आणि त्यामुळे तिने व्हीपी रोड येथील वडिलांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला. “ती तिच्या वडिलांच्या घरी आली आणि सागर तिला विरार येथील त्याच्या घरी परतण्याची विनंती करत होता. परंतु शीतल तयार नव्हती आणि म्हणून त्याने गुन्हा केला,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली. खाडिलकर रोडवर आल्यानंतर तिथे सागर आला, त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने त्याच्याकडील ब्लेडने तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर वार केले. त्यानंतर त्याने स्वत:च्या मनगटाला दुखापत केली होती. या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले होते.
हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी सागरला पकडून गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी सागरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत आरोपी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसत आहे. तर, दुसऱ्या व्हिडिओत स्थानिक आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देताना दिसत आहेत.