रामलीलाप्रमाणे गणेशोत्सव मंडपाच्या भाड्यातही ५० टक्के सवलत द्या! बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी

रामलीलासाठी पालिका प्रशासन मंडळांना ५० टक्के सवलत देते. त्याप्रमाणे पालिकेच्या मैदानात गणेशोत्सवासाठी मंडप उभारताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात ५० टक्के सवलत द्यावी.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : जागेअभावी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालिकेच्या मैदानात मंडप उभारतात. मंडप उभारणीसाठी पालिकेकडून पैसे आकारले जातात. रामलीलासाठी पालिका प्रशासन मंडळांना ५० टक्के सवलत देते. त्याप्रमाणे पालिकेच्या मैदानात गणेशोत्सवासाठी मंडप उभारताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात ५० टक्के सवलत द्यावी. तसेच मंडळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंडप परिसरात नि:शुल्क अग्निशमन दलाची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

पुढील महिनाभरात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. घराघरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बाप्पा विराजमान होतात. मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून दोन लाखांहून अधिक घरात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो मुंबईतील काही मंडळे जागे अभावी गेली ५० वर्षाहून अधिक वर्षे महापालिकेच्या मैदानात मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करीत असतात. साधारणत: गणेश मंडळे ३० दिवस सजावट करण्यासाठी व ३ दिवस सजावट काढण्यासाठी अशा २ वेगवेगळ्या परवानगी कित्येक वर्ष काढत असतात. परंतु यासाठी पालिकेकडून आकरण्यात येणारी अनामत रक्कम व भाडे मंडळाकडे जमा होणाऱ्या तुटपुंज्या वर्गणी, देणगीचा विचार करता अवाजवी आहे. मुंबईत साजरा होणाऱ्या रामलीला कार्यक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या पालिकेच्या मैदानाच्या भाड्यात महाराष्ट्र शासनाच्या मुंबई उपनगर पालकमंत्री यांच्या आदेशान्वये पालिकेच्या मैदानाचा रामलीला मैदानासाठी वापर करण्यासाठी भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली. यासाठी पालिकेने ६ ऑक्टोबर २०२३ रोजी पत्र निर्गमित केले होते, इतकेच नव्हे तर अग्निशमन सेवा निशुल्क वापरण्याची आदेशही देण्यात आले आहे.

दुजाभाव का ?

रामलीला व गणेशोत्सव हे दोन्ही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. विशेष म्हणजे मुंबईत साजरा होणारा गणेशोत्सव हा जगातील एक मोठा उत्सव असतो. मग या दोन्ही उत्सवा बाबत दुजाभाव का ? आपणास विनंती करण्यात येते की रामलीला उत्सवाच्या धरतीवर गणेश मंडळाकडून वापरण्यात येणाऱ्या महापालिकेच्या मैदानाच्या भाड्यात ५० टक्के सवलत मंडळांना देण्यात यावी तसेच ५०० हून अधिक भाविक जमा होणाऱ्या मंडळाच्या मंडपाशेजारी निशुल्क अग्निशामक सेवा पुरविण्यात यावी, अशी मागणी केल्याचे दहिबावकर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in