
मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर, माणगाव व वडपाडी बायपास रस्ते कामासाठी नव्याने निविदा मागवण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांनी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. गणेशोत्सवात भक्तांची गैरसोय होऊ नये, या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी रस्त्यांचे रुंदीकरण करा, यासाठी १५ कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्यात येईल. परंतु ही कामे पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत संबंधितांना बुधवारी दिले.
१८ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील या महामार्गाच्या कामाची हवाई व प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिल्यानुसार मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माणगाव, इंदापूर येथील वाहतूककोंडी, पर्यायी मार्ग याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्या कामांसाठी राष्ट्रीय महामार्गतर्फे निधी उपलब्ध होऊ शकत नाही, त्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वस्त केले.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीचे मनुष्यबळ तैनात करण्यासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दक्षता घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
या चार रस्त्यांचा विस्तार होणार
मोरबा रोड ते मुंबई - गोवा हायवे रस्ता,
साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता
इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता
निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता
दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री सहभागी
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग इंदापूर बायपास, माणगाव बायपास रस्त्यांच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.