
पेण : गेली पंधरा वर्षे रखडलेला आणि प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरलेला मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा एकदा आंदोलनाच्या केंद्रस्थानी आला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जन आक्रोश समितीने यंदा गणेशोत्सव थेट महामार्गावर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा’ या नावाने होणारे हे अनोखे आंदोलन १० ऑगस्टपासून सुरू होऊन ६ सप्टेंबरला मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी महाआरती आणि विसर्जनाने संपेल.
सन २०१० पासून चालू असलेल्या या महामार्गाच्या कामादरम्यान आतापर्यंत ४,५३१ जणांचा बळी गेला आहे. हे अपघात नसून, सरकार आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे झालेले खून आहेत, असा संतप्त आरोप समितीने केला आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील तरुणांना सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी द्यावी, असेही समितीचे म्हणणे आहे.
सरकारचे डोळे आणि कान उघडण्यासाठीच हा अभिनव गणेशोत्सव रस्त्यावर साजरा केला जाणार असल्याचे समितीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. १० ऑगस्ट रोजी पनवेलजवळ पळस्पे येथे सकाळी ११ वाजता पाटपूजन करून आंदोलनाचा श्रीगणेशा करण्यात आला. १७ ऑगस्ट रोजी दुपारी २:३० वाजता पेण येथे पाद्यपूजन सोहळा पार पडेल. २७ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता लांजा येथे मूर्ती स्थापना करून उत्सवाची सुरुवात होईल.
‘वर्षा’ निवासस्थानी महाआरती
२८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत महामार्गावरील पाली, संगमेश्वर, चिपळूण, खेड, पोलादपूर, लोणेरे, माणगाव, इंदापूर, कोलाड, नागोठणे आणि पळस्पे अशा विविध ठिकाणी महाआरतीचे आयोजन होईल. आंदोलनाची सांगता ६ सप्टेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी महाआरती व विसर्जनाने होईल.