

रायगड : गौरी-गणपती विसर्जनानंतर कोकणातून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास रविवारी दुपारपासून वाहतूक कोंडीत अडकला आहे. सोमवारी कामावर पोहोचण्यासाठी हजारो नागरिक भल्या पहाटेच घराबाहेर पडल्याने मुंबई-गोवा महामार्गासह रायगड जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली. अनेक प्रवाशांना सात ते साडेसात तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने परतीचा प्रवास यातना देणारा ठरला.
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहतूक कोंडीने गंभीर स्वरूप धारण केले. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहनांचा वेग अत्यंत मंदावल्याने काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठीही मोठा वेळ लागत होता. विशेषतः महिला, मुले तसेच वयस्कर मंडळींचे मोठे हाल झाले.
पनवेल आणि पुढे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना वडखळ आणि रामवाडी परिसरातही कोंडीचा सामना करावा लागला. या भागात सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या व वाहने मुंगीच्या गतीने चालत होती. कोकणातून परतणाऱ्या खासगी वाहनांसोबत एसटी बसेसची संख्या वाढल्याने रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण आणखी वाढला आहे.
कोकणातून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकडे परतणाऱ्या वाहनचालकांनी शक्य असल्यास गर्दीच्या मार्गांऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि महामार्गावर वाहन बिघाड झाल्यास ते शक्य तितक्या लवकर बाजूला करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, वडखळपर्यंत पोहोचलेले अनेक प्रवासी पुढे पनवेल आणि मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करत असून या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
उरणमध्ये पाच मिनिटांच्या अंतरासाठी दोन तास
उरण तालुक्यातील दिघोडे-दास्तान, गव्हाणफाटा-दिघोडे आणि कोप्रोली नाका परिसरातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. उरण परिसरातील वेअरहाऊस, सीएफएस आणि कंटेनर यार्डमुळे अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी अवजड वाहने आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नांमुळे वाहतुकीचा खोळंबा वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना तब्बल दोन तास ताटकळावे लागत असल्याचे चित्र आहे.
एसटीचा दुहेरी ताप
रायगड आणि रत्नागिरी विभागातील प्रमुख एसटी स्थानकांवर मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. या गाड्यांमुळे एकीकडे वाहतूक कोंडी असताना एसटी प्रवाशांचेही मोठे हाल झाले.