व्हीजेटीआयचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’; गोखले पुलाची वाहतूक गुरुवारपासून खुली, बर्फीवाला आणि गोखले पूल जोडणी यशस्वी

व्हीजेटीआयने वाहतूक खुली करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने गुरुवार ४ जुलैला सायंकाळी ५ वाजल्यापासून जुहू दिशेने अंधेरी असा पश्चिम-पूर्व मार्गिका वाहतुकीसाठी सुरू केली जाणार आहे.
व्हीजेटीआयचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’; गोखले पुलाची वाहतूक गुरुवारपासून खुली, बर्फीवाला आणि गोखले पूल जोडणी यशस्वी
Published on

मुंबई : बर्फीवाला आणि गोखले पुलातील उंचीचे अंतर कमी करण्यात आले आहे. दोन्ही पुलांची उंची समांतर करण्यासाठी हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टूल पॅकिंग’चा वापर केला. पालिकेने विक्रमी वेळेत आव्हानात्मक टप्पा पार केला आहे. त्यानंतर ‘नॉन डिस्‍ट्रक्‍टिव्‍ह’ आणि ‘क्‍यू’ या दोन महत्त्वपूर्ण चाचण्‍या आणि ‘लोड टेस्ट’ घेण्यात आली. या सर्व चाचण्‍यांचे परिणाम सकारात्‍मक आल्‍यानंतर व्हीजेटीआयने वाहतूक खुली करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने गुरुवार ४ जुलैला सायंकाळी ५ वाजल्यापासून जुहू दिशेने अंधेरी असा पश्चिम-पूर्व मार्गिका वाहतुकीसाठी सुरू केली जाणार आहे. दरम्यान, संपूर्ण गोखले पूल मार्च २०२५ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

अंधेरी परिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली सर्व कामे पूर्ण करण्यात येत आहेत. या अंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला १,३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजुला ६५० मिमी वर उचलण्यात आला आहे. या जोडणीच्या कामासाठी गत दोन महिन्‍यांपासून नियोजन सुरू होते. हे काम आव्‍हानात्‍मक असूनदेखील दिवस-रात्र सुरू असल्‍यामुळे केवळ ७८ दिवसांत पूर्ण झाले आहे.

‘काँक्रीट क्यूरिंग’च्या कामासाठी आवश्यक १४ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. या क्यूरिंगसाठी उच्च दर्जाच्‍या काँक्रिट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. क्यूरिंगसोबतच समांतर अशा पद्धतीने जोडणी सांध्याचे कामदेखील पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर पुलावर विशिष्ट तासांच्या कालावधीत ‘लोड टेस्ट’ करण्यात आली.

वाहतूक सुरू करण्याआधी दोन दिवस चाचण्या

पुलाच्‍या मार्गिकेवरील वाहतूक सुरू करण्‍याच्‍या दृष्‍टीने वाहतूक व्यवस्थापनासंबंधित कामे व चाचण्‍या वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील दोन दिवसांत पूर्ण केल्‍या जाणार आहेत. यानंतर गुरुवार, ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपासून पश्चिम-पूर्व मार्गिका वाहतुकीसाठी सुरू केली जाणार असल्‍याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अवजड वाहनांसाठी बंदी

गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे सी. डी. बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांसाठी उंची रोधक (हाईट बॅरिअर) बसविण्यात आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in