Mumbai : गोरेगावमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; तीन जण जखमी, १० जणांना अटक; मिरवणुकीदरम्यान वाद विकोपाला

गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात रविवारी दोन गटांत झालेल्या हिंसक चकमकीत ३ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास १० जणांना अटक केली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Mumbai : गोरेगावमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; तीन जण जखमी, १० जणांना अटक; मिरवणुकीदरम्यान वाद विकोपाला
Mumbai : गोरेगावमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; तीन जण जखमी, १० जणांना अटक; मिरवणुकीदरम्यान वाद विकोपाला
Published on

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात रविवारी दोन गटांत झालेल्या हिंसक चकमकीत ३ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास १० जणांना अटक केली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतोष नगर मार्केट परिसरातील एका कार्यक्रमादरम्यान रविवारी दुपारी ४ ते ५ च्या सुमारास ही घटना घडली. जुन्या वैयक्तिक वादातून दोन गट समोरासमोर आल्याने या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

संतोष नगर मार्केटजवळून एक धार्मिक मिरवणूक जात असताना हा वाद सुरू झाला. मिरवणूक मंचाच्या दिशेने जात असताना आरोपींनी मोठ्या आवाजावर आक्षेप घेतला आणि संगीत यंत्रणेचे नुकसान केले. मिरवणुकीतील सदस्यांनी यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही गटांत बाचाबाची झाली. याचे पर्यवसान हाणामारीत होऊन दोन्ही बाजूंनी काठ्या आणि तलवारींनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या ३ जणांना तातडीने जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत १० जणांना अटक केल्याची माहिती परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी दिली.

या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून पालिकेकडूनही कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी करून पुढील पावले उचलली जातील, असेही त्यांनी नमूद केले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अन्य आरोपींची ओळख पटवून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अवैध बांधकामांवर पालिकेचा हातोडा

याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९१(१) आणि १९१(२) अंतर्गत दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेले काही आरोपी संतोष नगर भागातील अनधिकृत बांधकामांमध्ये राहत असल्याचे समोर आले. या बेकायदेशीर बांधकामांबाबत महापालिकेकडे आधीच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने सोमवारी सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात बुलडोझरच्या सहाय्याने आरोपींशी संबंधित अवैध बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in