

मुंबई : आता गोरेगाव-मुलुंड लिंक वर प्रकल्पात भूमिगत बोगद्याचे खोदकाम करण्यासाठी टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात येणार असून ‘तुळशी’ असे नामकरण करण्यात आले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली ५.३० किमीचा बोगदा खोदण्याच्या कामाला सोमवार, १७ ऑगस्टपासून सुरुवात झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकल्पामुळे ९० मिनिटांचा प्रवास २० मिनिटांत करणे शक्य होणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्पात भूमिगत बोगद्याचे खोदकाम करण्यासाठी टनेल बोरिंग मशीनचे नामकरण ‘मावळा’ असे करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन तंत्रज्ञानाद्वारे ५.३० किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिले बोगदा खणन संयंत्र कार्यान्वित करुन गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत बोगदा खोदकामास सोमवारी प्रारंभ करण्यात आला आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन तंत्रज्ञानाद्वारे ५.३० किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. या बोगद्यांच्या बांधकामादरम्यान पर्यावरण आणि जैवविविधतेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
तीन वर्षांत अपेक्षित!
टीबीएम-२ ची जोडणी प्रगतिपथावर आहे. त्याद्वारे ऑक्टोबर २०२६ पासून खोदकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
व्हीजेटीआय करणार थर्ड पार्टी ऑडिट
प्रकल्पाच्या गुणवत्ता नियंत्रण व देखरेखीसाठी मेसर्स टिप्स्या इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, भारतीय तंत्रज्ञान संस्था यांची फेरतपासणी सल्लागार तसेच व्हीजेटीआय, मुंबई यांची तृतीय पक्ष गुणवत्ता लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाची सुमारे २१ टक्के भौतिक प्रगती झाली आहे. टीबीएमची-१ ची जोडणी पूर्ण होऊन स्थळ स्वीकृती चाचणी देखील यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.
१८०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकणार
दुहेरी बोगद्यांमध्ये रस्त्याखाली उपयोगिता वाहिन्यांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक बोगद्यातून १८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
सीसीटीव्ही, स्काडा प्रणालीचा समावेश!
प्रकल्पात टनेल बोरिंग मशीनद्वारे बोगदा खोदकाम, ऑस्ट्रियाच्या नवीन बोगदा खणण्याच्या तंत्रज्ञानाद्वारे क्रॉस पॅसेजचे बांधकाम, यांत्रिक वायुवीजन व्यवस्था, मिस्ट आधारित अग्निशमन प्रणाली, सीसीटीव्ही, स्काडा नियंत्रण प्रणाली, एलईडी प्रकाशयोजना तसेच आधुनिक दिशादर्शक फलक यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
७२० मीटर लांबीचे दुहेरी बोगदे!
या प्रकल्पामध्ये १७ क्रॉस पॅसेज, ७२० मीटर लांबीचे दुहेरी पेटी बोगदे, गोरेगाव व मुलुंड येथे ६०० मीटर लांबीचे पोहोच रस्ते यांचा समावेश असून, प्रकल्पाची एकूण लांबी ६.६२ किलोमीटर आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षे संचलन व देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे.
कांजूर येथे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन!
प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून टप्पा-१ आणि टप्पा-२ अंतर्गत आवश्यक पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आवश्यक वृक्षतोड परवानगी मिळाली आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सुमारे ९०६ प्रकल्पग्रस्तांचे कांजूरमार्ग येथे तळमजला अधिक २३ मजली अशा सहा इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे.