'विहार' खोदणार दुसरा बोगना; 'तुळशी' द्वारे २७० मीटर खोदकाम पूर्ण, दुहेरी बोगद्याच्या खोदकामाला वेग, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता

पूर्व व पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) खालून बांधण्यात येणाऱ्या दुहेरी भूमिगत बोगद्याच्या कामात महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात यश आले आहे.
'विहार' खोदणार दुसरा बोगना; 'तुळशी' द्वारे २७० मीटर खोदकाम पूर्ण, दुहेरी बोगद्याच्या खोदकामाला वेग, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता
'विहार' खोदणार दुसरा बोगना; 'तुळशी' द्वारे २७० मीटर खोदकाम पूर्ण, दुहेरी बोगद्याच्या खोदकामाला वेग, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता
Published on: 

मुंबई : पूर्व व पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) खालून बांधण्यात येणाऱ्या दुहेरी भूमिगत बोगद्याच्या कामात महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात यश आले आहे. या दुहेरी बोगद्यांपैकी पहिल्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या 'तुळशी' या बोगदा खनन यंत्राद्वारे आतापर्यंत २७० मीटर लांबीचे खोदकाम पूर्ण केले आहे. तर दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी सज्ज असलेल्या 'विहार' या दुसऱ्या बोगदा खनन यंत्राद्वारे शनिवार ७ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष खोदकामास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील दोन्ही बोगद्यांच्या निर्मितीच्या कामाला आता गती प्राप्त झाली आहे.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा महापालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड पश्चिम येथील अमर नगर दरम्यान नॅशनल पार्क मधील उद्यानाच्या खाली अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन तंत्रज्ञानाद्वारे ५.३४ किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिल्या बोगदा खणन सयंत्राचे नामकरण 'तुळशी' आणि दुसऱ्या बोगदा खणन सयंत्राचे नामकरण 'विहार' असे करण्यात आले आहे. संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर सोमवार, १७ ऑगस्ट रोजी 'तुळशी' कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यानंतर आतापर्यंत गोरेगावकडून मुलुंडच्या दिशेने २७० मीटरपेक्षा अधिक लांबीचे खोदकाम पूर्ण केले आहे. सध्या या संयंत्राची खोदकामाची सरासरी गती प्रतिदिन सहा मीटरपर्यंत पोहोचली असून, कामातील प्रगतीनुसार ही गती टप्प्याटप्प्याने प्रतिदिन १० मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.

दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या 'विहार' या बोगदा खनन संयंत्राची स्थळ स्वीकृत चाचणी (Site Acceptance Test) नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या चाचणीदरम्यान संयंत्राची विविध यांत्रिक, विद्युत, हायड्रॉलिक तसेच नियंत्रण प्रणालींची निर्धारित तांत्रिक निकषांनुसार तपासणी करण्यात आली. खोदकामासाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा, उपकरणे आणि सुरक्षा प्रणालींची कार्यक्षमता पडताळून पाहण्यात आली. तसेच, संयंत्राचे विविध घटक प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी अपेक्षित क्षमतेनुसार कार्यरत असल्याची खात्री करण्यात आली. या सर्व चाचण्या निर्धारित निकषांनुसार पूर्ण झाल्यानंतर 'विहार'ला प्रत्यक्ष बोगदा खनन कार्यासाठी सज्ज घोषित करण्यात आले.

फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत प्रत्येक भूमिगत बोगद्याची एकूण लांबी ६,६७५ मीटर आहे. यापैकी ५,३४० मीटर लांबीचा भाग बोगदा खनन तंत्रज्ञानाद्वारे खोदण्यात येणार असून, उर्वरित १,३३५ मीटर लांबीमध्ये बॉक्स बोगदा, प्रवेश व निर्गमन मार्गिका (Ramps) आणि शाफ्ट यांचा समावेश आहे. या दोन्ही बोगद्यांचा अंतर्गत व्यास १३ मीटर असून, प्रत्येक बोगद्यातून प्रत्येकी तीन अशा एकूण सहा मार्गिकांद्वारे (३+३ लेन) वाहनांची वाहतूक होणार आहे. दोन्ही बोगदा खनन संयंत्रे गोरेगाव येथून खोदकाम करत मुलुंड पश्चिमेकडील अमर नगर येथे बाहेर पडणार आहेत. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान थेट भूमिगत वाहतूक मार्ग उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

मनुष्यबळ, तांत्रिक कर्मचारी वाढवणार

पहिल्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या 'तुळशी'च्या कामासोबतच आता 'विहार 'द्वारे दुसऱ्या बोगद्याचे खोदकामही सुरू झाल्याने दोन्ही बोगद्यांच्या निर्मितीच्या कामाला समांतर गती मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या नियोजित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रगती साधता येणार आहे. खोदकामात कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. कामाच्या प्रगतीचा, उपलब्ध यंत्रसामग्रीचा, तांत्रिक बाबींचा व मनुष्यबळाच्या आवश्यकतेचा नियमित आढावा घेऊन गरजेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

१३१ बांधकामावर लवकरच हातोडा !

या प्रकल्पातील मुलुंड येथील बोगद्याच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी आवश्यक असलेल्या रिट्रिव्हल शाफ्ट आणि रॅम्पच्या बांधकामात एकूण ७४३ बांधकामे बाधित होत होती. त्यापैकी आतापर्यंत ६१२ बाधित बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. उर्वरित १३१ बाधित बांधकामे डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत किंवा जानेवारी २०२७ च्या सुरुवातीपर्यंत निष्कासित करण्याचे नियोजन आहे. या बांधकामांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधित कुटुंबांचे कांजूरमार्ग येथील पुनर्वसन इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असून या इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.

स्वच्छतेची काळजी घ्या!

बोगदा खननाचे काम तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक असल्याने कामाचा वेग राखतानाच कामगार आणि अभियंत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा मानकांचे पालन करावे, आवश्यक सुरक्षा साधने व उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करावी व संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)