Mumbai : गोवंडीत महिलेनेच केली तरुणीची हत्या; दिवसाढ‌वळ्या झाडल्या गोळ्या, तिहेरी प्रेमप्रकरणाचा संशय

गोवंडीत भरदिवसा रस्त्यात एका १९ वर्षांच्या तरुणीवर गोळ्या झाडण्यात आल्या. तरुणीवर गोळी झाडणाऱ्या महिलेला (वय २५) आणि तिच्या प्रियकराला (वय २३) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Mumbai : गोवंडीत महिलेनेच केली तरुणीची हत्या; दिवसाढ‌वळ्या झाडल्या गोळ्या, तिहेरी प्रेमप्रकरणाचा संशय
Published on

मुंबई : गोवंडीत मंगळवारी भरदिवसा रस्त्यात एका १९ वर्षांच्या तरुणीवर गोळ्या झाडण्यात आल्या. जखमी तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले. दिवसाढ‌वळ्या घडलेल्या या हत्येमुळे मुंबई हादरली आहे. याप्रकरणी तरुणीवर गोळी झाडणाऱ्या महिलेला (वय २५) आणि तिच्या प्रियकराला (वय २३) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर भरदिवसा गोळीबाराची घटना ताजी असताना आता गो‌वंडीत दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली. गोवंडीतील कमला रमननगरमध्ये ही घटना घडली. तरुणीचे नाव शिफा शेख असून ती शिवाजीनगर झोपडपट्टीत आई-वडील आणि भावंडासह राहत होती. शिफा दुपारी १२ वाजता जेवण्यासाठी बाहेर पडली असताना तिच्या मानेवर गोळ्या झाडल्या.

दरम्यान, गोळीबाराची ही घटना प्रेम त्रिकोणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केली आहे. शिफा हिचे नदीम या तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र, नदीमचे आणखी एका महिलेबरोबरही संबंध होते. तिहेरी प्रेमसंबंधांतून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद देखील सुरू होते. त्या महिलेनेच शिफावर हल्ला केला, त्यानंतर ती फरार झाली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महिलेसह तिचा प्रियकर नदिमलाही अटक केली आहे. शिफाच्या हत्येमागे नदीमचाही हात आहे का, पिस्तूल कुठून आले अशा प्रश्नांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in