Mumbai : मित्राच्या GST खात्याचा गैरवापर; CA वर गुन्हा दाखल

मित्राच्या नावावर उघडलेल्या जीएसटी खात्याचा बेकायदेशीर वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी लखनऊस्थित चार्टर्ड अकाउंटंट रशीद रईस सिद्दीकी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गैरव्यवहारामुळे संबंधित व्यक्तीवर तब्बल ४.६९ कोटी रुपयांची संभाव्य करदेयता निर्माण झाल्याचा आरोप आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

अवधूत खराडे / मुंबई : मित्राच्या नावावर उघडलेल्या जीएसटी खात्याचा बेकायदेशीर वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी लखनऊस्थित चार्टर्ड अकाउंटंट रशीद रईस सिद्दीकी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गैरव्यवहारामुळे संबंधित व्यक्तीवर तब्बल ४.६९ कोटी रुपयांची संभाव्य करदेयता निर्माण झाल्याचा आरोप आहे.

फिर्यादी नसीर हुसेन कदर हुसेन शेख (वय ३६) हे बीकेसी येथील एका कंपनीत आयटी सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. ते ट्रॉम्बे येथील चिता कॅम्पमध्ये राहतात. त्यांचे ‘न्यू इंडिया एंटरप्रायझेस’ नावाचे मोबाईल फोनचे दुकान असून ते त्यांच्या मोठ्या भावाकडून चालवले जाते.

फेब्रुवारी २०१८ मध्ये नसीर यांनी ऑनलाइन मोबाईल विक्रीसाठी ‘हिपकार्ट’ नावाची ई-कॉमर्स वेबसाइट सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जीएसटी नोंदणी आवश्यक होती. याआधी २०१६ मध्ये लखनऊतील अमीनाबाद येथे भेटीदरम्यान नसीर यांची ओळख मित्र युसूफ शेख यांच्या चुलत भावाशी, रशीद सिद्दीकी याच्याशी झाली होती. सिद्दीकीने स्वतःला चार्टर्ड अकाउंटंट असल्याचे सांगितले होते आणि कालांतराने दोघांमध्ये मैत्री झाली.

सिद्दीकीने नसीर यांच्या व्यवसायासाठी जीएसटी नोंदणी करून देण्याची तयारी दर्शवली. ५ मार्च २०१८ रोजी त्याने आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वीजबिलाची मागणी केली. कागदपत्रे मिळाल्यानंतर १३ मार्च २०१८ रोजी जीएसटी खाते यशस्वी उघडल्याचे सांगत सिद्दीकीने व्हॉट्सॲपवर जीएसटी प्रमाणपत्र पाठवले.

मात्र नसीर यांचा ऑनलाइन व्यवसाय सुरूच झाला नाही आणि कोणतीही विक्री झाली नाही. जून २०१८ मध्ये सिद्दीकीने जीएसटी रिटर्न भरण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. व्यवहार नसल्याने नसीर यांनी GST खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. सिद्दीकीने खाते बंद करण्यासाठी ३ हजार रुपये घेतले आणि पावती (अॅक्नॉलेजमेंट स्लिप) देण्याचे आश्वासन दिले; मात्र ती कधीच दिली नाही. त्यानंतर सिद्दीकीने फोन उचलणेही बंद केले.

फेब्रुवारी २०२० मध्ये नसीर यांना बेलापूरच्या जीएसटी कार्यालयाकडून नोटीस मिळाली. ज्यात त्यांच्या जीएसटी खात्यावर २८ लाख रुपये थकीत असल्याचे नमूद होते. नसीर यांनी तत्काळ जीएसटी अधिकाऱ्यांकडे लेखी माहिती देऊन कोणतेही व्यवहार झाले नसल्याचे व सिद्दीकीने खाते बंद केल्याचे सांगितले. यावेळी मित्र युसूफ शेख आणि भाऊही त्यांच्यासोबत होते.

यानंतर नसीर यांना माहिती मिळाली की, सिद्दीकीने अनेक व्यक्तींच्या नावाने जीएसटी खाती उघडून कोट्यवधींचा फसवणूक प्रकार केला असून, या प्रकरणांमध्ये त्याला अटकही झाली आहे, असे एफआयआरमध्ये नमूद आहे.

१५ जून २०२३ रोजी जीएसटी अधीक्षक सुनील आहेर यांनी सीमाशुल्क कायद्याच्या कलम १०८ अंतर्गत नसीर यांना समन्स बजावून, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँकेतील मागील पाच वर्षांतील खात्यांची सखोल तपासणी केली. तपासणीत कोणतेही संशयास्पद व्यवहार आढळले नाहीत.

तरीही, ऑगस्ट २०२४ मध्ये नसीर यांना जीएसटी विभागाकडून आणखी एक नोटीस मिळाली. त्यात २०१७–१८ आणि २०१८–१९ या कालावधीत त्यांच्या जीएसटी खात्यातून बनावट व्यवहार झाल्याचा आरोप करत ४,६९,१०,५६२ रुपयांचा दंड देय असल्याचे नमूद होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या वैयक्तिक सुनावणीदरम्यान नसीर यांनी संपूर्ण घटना पुन्हा मांडून सिद्दीकीविरुद्ध कारवाईची मागणी केली.

logo
marathi.freepressjournal.in