

उरण : मुंबई उपनगरीय प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी सेंट्रल रेल्वेने हार्बर लाइनवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, १ मे २०२६ पासून सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावरील १४ नॉन-एसी लोकल फेऱ्यांचे एसी सेवांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मध्य रेल्वेवरील एसी लोकल फेऱ्यांची एकूण संख्या १०८ वर पोहोचली आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, या नव्या १४ फेऱ्यांनंतर हार्बर मार्गावर एकूण २८ एसी सेवा उपलब्ध होतील, तर मुख्य मार्गावर ८० एसी सेवा सुरू राहतील. यापूर्वी २६ जानेवारी २०२६ रोजी हार्बर लाइनवर पहिली एसी लोकल सुरू करण्यात आली होती. या सर्व एसी सेवा सोमवार ते शनिवार धावणार असून रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी त्या नॉन-एसी लोकल म्हणून चालवल्या जाणार आहेत.
एसी लोकलचे वेळापत्रक (सोमवार ते शनिवार)
अप दिशा (सीएसएमटीकडे) :
वाशी - सकाळी ६:२३
पनवेल – सकाळी ८:४५
पनवेल – सकाळी ११:४३
बेलापूर - दुपारी २:२८
पनवेल – सायं. ५:०७
पनवेल – रात्री ८:०७
पनवेल – रात्री १०:५८
डाऊन दिशा (पनवेल/वाशीकडे) :
सीएसएमटी - सकाळी ७:१७
सीएसएमटी - सकाळी १०:१०
सीएसएमटी - दुपारी १:०७
सीएसएमटी - दुपारी ३:३६
सीएसएमटी - सायं. ६:३३
सीएसएमटी - रात्री ९:३०
सीएसएमटी - मध्यरात्री १२:२४
एसी लोकलच्या समावेशामुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. बेलापूर-सीएसएमटी (BR12) सकाळी ६:०८ ऐवजी ६:०२, वाशी-सीएसएमटी (V16) सकाळी ६:१६ ऐवजी ६:२३, सीएसएमटी-वाशी (V69) २३:४२ ऐवजी ००:२४, सीएसएमटी-पनवेल (PL3) ००:२४ ऐवजी २३:४२ असे बदल करण्यात आले असून प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.
डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे