Mumbai : काँक्रीटीकरण सुरू असलेल्या जागेवरच फेरीवाल्यांचा कब्जा

मुंबईच्या अनेक भागांमध्ये पालिकेच्या वतीने रस्त्याच्या काँक्रीटीकरणांचे काम हाती घेण्यात आले आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पूनम पोळ / मुंबई -

मुंबईच्या अनेक भागांमध्ये पालिकेच्या वतीने रस्त्याच्या काँक्रीटीकरणांचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, फेरीवाल्यांनी चक्क काँक्रीटीकरण सुरू असलेल्या जागेवर ठेले मांडल्याचा प्रकार दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर समोर आला आहे. यामुळे रस्त्याच्या काँक्रीटीकरणाबाबत पालिकेचे अधिकारी तरी गंभीर आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

दादर पूर्व येथील एम. एम. जी. एस. मार्ग येथे गेल्या काही महिन्यापासून रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. ही कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी कंत्राटदारांना दिले आहे. तसेच, काँक्रीटीकरणा व्यतिरिक्त रस्त्यावर कोणतेही खोदकाम करू नये, असे निर्देश पालिका आयुक्तांनी रस्त्यांबाबतीत दिले आहे. मात्र, रस्त्यावरील कामे सुरळीत पार पडत आहे की नाही याची दखल पालिका अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेतली जात नसल्याचेच दादर पूर्व येथील रेल्वे स्थानकाबाहेर सुरू असलेल्या कामानिमित्त समोर आले आहे.

या ठिकाणी ठाण मांडून बसणारे फेरीवाले यांनी काँक्रीटीकरण सुरू असलेल्या जागेवरच कब्जा केला आहे. या दुकानासमोर सामान खरेदी करणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. काम सुरू असलेल्या रस्त्याच्या मधोमध लोकांची गर्दी होत असल्याने रस्त्यावरील सिमेंट निघाल्याचे चित्र आहे. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

किती दिवस दुकान बंद ठेवणार?

आमचे कुटुंब या दुकानाच्या जीवावर जगते. रस्त्याची कामे मे महिन्यापर्यंत सुरू असणार आहेत. असे आम्हाला पालिका अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच समजले. तोपर्यंत आम्ही धंदा बंद करू शकत नाही आणि पालिकेचे अधिकारी जर कारवाईसाठी येणार असतील तर आम्हाला आधीच समजते. तेव्हा आम्ही आमचे दुकान काही वेळेसाठी बंद करतो आणि अधिकारी गेल्यावर पुन्हा लावतो. तसेच, मुंबईच्या रस्त्यांवर कितीही कामे केली तरी त्यावर खड्डे पडतात. त्यामुळे आमच्यामुळे रस्त्याच्या कामात अडथळा येत आहे. असे म्हणाऱ्यांचे आरोप चुकीचे आहे. असे मत रस्त्याच्या काँक्रीटीकरणा दरम्यान दुकान मांडणाऱ्या फेरीवाल्याने मांडले.

logo
marathi.freepressjournal.in