मुंबई : मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांपैकी आतापर्यंत ५७ हजार ६९७फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटप झाले तर ३ हजार ९५० फेरीवाल्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे, तर ३७ हजार ७८८ फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. तरी ३१ ऑगस्टपर्यंत क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्याची अंतिम तारीख आहे.
शासनाकडून पथविक्रेता योजनेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर, त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरू करता यावी, यासाठी बृहन्मुंबई मनपाच्या प्रशासकीय विभाग स्तरांवरील प्राथमिक तयारी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्या दिशेने कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाले धोरण तसेच कामकाजसंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात गुरुवारी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते, उपआयुक्त चंदा जाधव, उपआयुक्त विश्वास मोटे, संतोषकुमार धोंडे, मनीष वळंजू, अनुज्ञापन अधीक्षक अनिल काटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पथविक्रेता समिती व ७परिमंडळीय नगर पथविक्रेता समित्यांचे पुढील कामकाज प्रशासनाने विहित प्रक्रियेनुसार वेगाने पूर्ण करावे. विशेषतः शासनाला सादर करण्यात आलेली पथविक्रेता योजना मंजूर होऊन अधिसूचित झाल्यानंतर त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरू झाली पाहिजे. ऐनवेळी धावपळ होऊ नये, यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग स्तरावर विक्री प्रक्षेत्र निश्चित करण्याची प्राथमिक कार्यवाही वेगाने करावी. अनधिकृत पथविक्रीबाबत तक्रारीसाठी उपलब्ध करून दिलेल्या यंत्रणेची व्यापक जनजागृती करावी, इत्यादी निर्देश रितू तावडे यांनी दिले.
सदस्य नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
फेरीवाले धोरण तसेच कामकाजविषयक अद्ययावत माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा आणि उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते यांनी संगणकीय सादरीकरणासह दिली. पथविक्रेता समित्यांवरील अशासकीय सदस्यत्वासाठी अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटना संवर्गातून १०७, निवासी कल्याण संघ संवर्गातून २७ आणि व्यापारी संघांचे प्रतिनिधी संवर्गातून १९ असे एकूण १५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदस्य नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे त्यांनी सांगितले.