मुंबईतील आरोग्य सेवेची अवस्था बिकट; वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. महानगरपालिकेने यावर्षी ७४ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, त्यात आरोग्य विभागासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्य सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
मुंबईतील आरोग्य सेवेची अवस्था बिकट; वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली चिंता
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. महानगरपालिकेने यावर्षी ७४ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, त्यात आरोग्य विभागासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्य सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे? असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांनी वांद्रे येथील भाभा रुग्णालयाला भेट दिली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला त्यानंतर प्रतिक्रीया देताना त्या म्हणाल्या की, वांद्रे पश्चिम येथे के. बी. भाभा रुग्णालयाच्या नवीन इमारतीत सध्या ४३६ खाटा आहेत, या इमारतीत कॅथलॅब, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, कार्डीयाक व ब्लड बँक या सुविधा पुरवल्याशिवाय रुग्णालयाचे उद्घाटन करणार नाही अशी ग्वाही महापालिकने दिली होती परंतु आजपर्यंत या सुविधा सुरू केलेल्या नाहीत. या रुग्णालयात विविध विभागात १०० डॉक्टरांची आवश्यकता आहे व पुरेसे डॉक्टर नाहीत. रुग्णालयात वेळेवर औषधे मिळत नाहीत, मधुमेह, ब्लड प्रेशरच्या औषधांचा तुडवडा आहे. २०२४-२५ मध्ये औषधांसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद केली होती ती यावर्षी कमी करून ६ कोटी रुपये केली आहे. १४ महिन्यांपासून औषधांच्या निविदा काढलेल्याच नाहीत.

अतिदक्षता विभागात आयसीयु, ट्रॉमा आयसीयू, लहान मुलांचे आयसीयू विभाग आहेत. परंतु डॉक्टर उपलब्ध नाहीत. रुग्णालयाच्या बेडच्या तुलनेत अतिदक्षता विभागातील बेड्सची संख्या फारच कमी आहे. २ डी इको मशीन उपलब्ध नाही, पॅथालॉजी सुविधाही बंद आहे. सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या तपासण्यांसाठी या उपनगरी रुग्णालयांमध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. अशा तपासण्यांची गरज भासल्यास रुग्णांना मोठा खर्च करून बाहेर जावे लागते.

बीएमसीतील राज्य सरकार नियुक्त प्रशासक राज मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळत आहे. ७ हजार कोटी रुपयांची तरतूद असताना मुंबईकरांना चांगल्या आरोग्य सुविधा का मिळत नाहीत, हे पैसे कोणाच्या खिशात जातात याचे उत्तर राज्य सरकार व बीएमसी प्रशासकाने द्यावे असे खासदार गायकवाड म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in