

देवश्री भुजबळ / मुंबई
आठवडाभर उष्णतेच्या लाटेचा सामना केल्यानंतर मुंबईकरांना शनिवार-रविवारी काहीसा दिलासा मिळाला. रविवारी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३४.३ अंश सेल्सिअस, तर कुलाबा वेधशाळेत ३३.७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दिवसा हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते.
मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील ४८ तासांच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार, आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५ आणि २७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. उष्ण व दमट हवामान किंवा उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थितीबाबत कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
मात्र, वाऱ्यांच्या दिशेत बदल होत असताना आणि तापमानात काहीशी घट झाल्यानंतर हवेची गुणवत्ता खालावू लागली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, रविवारी संध्याकाळी मुंबईचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १२५ नोंदवला. शहरातील सर्वाधिक खराब हवेची नोंद झालेल्या भागांमध्ये कुलाबा (१६५), अंधेरी पूर्व (१६२), भांडुप पश्चिम (१५८), देवनार (१५५), मालाड पश्चिम (१५१), वांद्रे-कुर्ला संकुल (१४९) आणि वरळी (१४१) यांचा समावेश आहे.
प्रतिचक्रीवादळीय स्थितीमुळे निर्माण झालेले पूर्वेकडील वारे आणि मान्सूनच्या लवकर माघारीचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यात मुंबई परिसरात तीव्र हवामानाचा अनुभव आला. यावेळी कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. हे तापमान महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान ठरलेच; शिवाय गेल्या ११ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान म्हणून त्याची नोंद झाली.
पावसाचा इशारा
तीव्र उष्णतेनंतर आता महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील अनेक जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी पावसासह मेघगर्जना आणि वादळी हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.