पाऊस मुंबई मुक्कामी! ट्रॉम्बे येथे इमारतीचे छत कोसळून एक जखमी; रेल्वे, रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला

जवळपास महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर मुंबईत मुक्काम ठोकल्याने मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जवळपास महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर मुंबईत मुक्काम ठोकल्याने मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. गुरुवार सकाळपासून मुंबई मुक्कामी आलेल्या पावसाने शुक्रवारी धुवाँधार कोसळून आपण मुंबईत तळ ठोकणार असल्याचे संकेत दिले.

रविवार, ९ जून रोजी दमदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई परिसरात दमदार इनिंगला सुरुवात केली. दिवसभरात पडलेल्या पावसामुळे पडझडीच्या घटना घडल्या. ट्रॉम्बे येथील एक्सर स्टुडिओच्या मागे एकमजली बांधकाम असलेल्या इमारतीच्या छताचा भाग कोसळून एक जण जखमी झाला, तर पावसामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीचा वेगही मंदावला होता. दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबई शहर व उपनगरांत आकाश ढगाळ राहून अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईकरांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्यामुळे मुंबईकर घामाच्या धारांनी हैराण होते. हवामान विभागाने दिलेले पावसाचे अंदाजही अनेकदा फोल ठरले. अखेर जून संपता संपता गायब झालेला पाऊस पुन्हा गुरुवारपासून परतला व दुसऱ्या दिवशीही (शुक्रवारी) पावसाने संततधार सुरूच ठेवली. पावसामुळे रेल्वे सेवा, रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाल्याने ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर झाला. पावसामुळे शहर व उपनगरांत झाडे, झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. ट्रॉम्बे येथे एक्सर स्टुडिओच्या मागे इमारतीच्या बांधकामाचा भाग कोसळून कमल कुमार अरुण दुधीयार (३६) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दिवसभरातील पावसाची नोंद

शहर - ६६.५३ मिमी

पूर्व उपनगर - ७९.६५

पश्चिम उपनगर - ५९.४२

कमाल व किमान तापमान

कुलाबा - ३१.४ - २४.४ डिग्री सेल्सिअस

सांताक्रुझ - ३१.६ - २४ .९ डिग्री सेल्सिअस

झाडे व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या ३९ घटना

जोरदार पावसामुळे शहरात १०, पूर्व उपनगरांत ९ व पश्चिम उपनगरांत २० अशा एकूण ३९ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in