मुंबई : कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या पालकांना मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी पश्चिम उपनगरातील त्याच्या निवासस्थानाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करताना मुलाला खाडेबोल सुनावत चांगलाच झटका दिला.
न्या. जितेंद्र एस जैन यांच्या एकलपीठाने पालकांना “पूर्ण आदर, प्रेम आणि काळजी” घेण्याचे निर्देश दिले. त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय झाल्यास गय केली जाणार नाही आदेशाचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, अशी तंबी दिली.
पालकांना मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी पश्चिम उपनगरातील त्याच्या निवासस्थानाचा वापर करण्यापासून रोखण्यास कनिष्ठ न्यायालयाने २०१८ मध्ये नकार दिला. त्या निर्णयाविरोधात मुलाने उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र एस जैन यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयाने अपीलबाबत नाराजी व्यक्त करत श्रावणबाळाचा उल्लेख केला. कोठे कवडीतून आपल्या माता पित्याला तीर्थयात्रेला घेऊन जाणारा श्रावणबाळ आणि आपल्या आजारी आणि वृद्ध पालकांची काळजी घेण्याचे नैतिक कर्तव्य बजावण्याऐवजी प्रतिबंधात्मक आदेशासाठी न्यायालयात खेचणारा मुलगा. ही खेदाची बाब आहे.
संस्कृतीत रुजवण्यात आलेली नैतिक मूल्ये घसरली आहेत. आपण पालकांना तीर्थयात्रेला घेऊन जाणाऱ्या श्रावण कुमारला विसरलो आहोत, अशी खंत व्यक्त करीत मुलाला पित्याला रुग्णालयात दाखल करण्याचे अंतरीम आदेश दिले.
न्यायालय म्हणते
आपल्या पालकांची काळजी घेणे हे केवळ एक पवित्र आणि नैतिक कर्तव्य नाही, तर ते प्रेमाचे काम आहे जे पूर्ण वर्तुळात येते कारण जेव्हा तुम्ही तुमच्या पालकांचा आदर, प्रेम, आदर आणि काळजी घेण्याचा निर्णय घेता तेव्हा ते केवळ एखाद्याच्या कृतज्ञतेची अभिव्यक्ती नसते, तर ते स्वतः देवाचा सन्मान असते. मात्र दुर्दैवाने, कधीकधी कठोर वास्तव पूर्णपणे वेगळे असते, पालक आपल्या दहा मुलांची काळजी घेऊ शकतात, परंतु ही दहा मुले त्यांच्या पालकांची काळजी घेऊ शकत नाहीत, हे दुर्दैव आहे.