स्वच्छता से स्वच्छता तक... मुंबई न्यायालयाचा हिसका; बनावट तक्रार दाखल करणाऱ्याला रुग्णालयात लादी पुसण्याचे काम

'तुम से, तुम तक' या नवीन शोवरून झी टीव्हीविरुद्ध बनावट तक्रार दाखल करणाऱ्याला उच्च न्यायालयाने चांगलाच हिसका दिला. तक्रारदाराच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत न्यायालयाने संबंधित तक्रारदाराला सरकारी जे जे रुग्णालयात स्वच्छता व लादी पुसण्याचे काम करण्याचे आदेश दिले.
स्वच्छता से स्वच्छता तक... मुंबई न्यायालयाचा हिसका; बनावट तक्रार दाखल करणाऱ्याला रुग्णालयात लादी पुसण्याचे काम
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : 'तुम से, तुम तक' या नवीन शोवरून झी टीव्हीविरुद्ध बनावट तक्रार दाखल करणाऱ्याला उच्च न्यायालयाने चांगलाच हिसका दिला. तक्रारदाराच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत न्यायालयाने संबंधित तक्रारदाराला सरकारी जे जे रुग्णालयात स्वच्छता व लादी पुसण्याचे काम करण्याचे आदेश दिले.

झी टीव्हीवरील 'तुम से तुम तक' या नवीन शोवर विविध आरोप करीत महेंद्र संजय शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. त्याआधारे पोलिसांनी दाखल केलेला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) रद्द करण्याची मागणी करीत झी टीव्हीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. झी टीव्हीच्या या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचवेळी तक्रारदाराच्या वर्तनावर ताशेरे ओढत खंडपीठाने त्याला चांगलाच धक्का दिला. शर्माने सुरुवातीला सायबर सेलकडे आपले नाव 'सुनील शर्मा' असे नोंदवले होते.

मात्र गेल्या महिन्यात जेव्हा त्याला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले, तेव्हा त्याने आपले नाव 'सुनील महेंद्र शर्मा' असल्याचे सांगितले. त्याच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांमध्ये त्याचे नाव 'महेंद्र संजय शर्मा' असे दिसून आले आहे.

तक्रारदाराने मोठ्या मीडिया हाऊसविरुद्ध एफआयआर दाखल करत असताना काही प्रकारची कारवाई होण्याची भीती असल्याने तक्रारीत नाव बदलले आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. तक्रारदाराचे हे वर्तन धक्कादायक असल्याचे मत व्यक्त करीत खंडपीठाने त्याला जे जे रुग्णालयात स्वच्छता आणि लादी पुसण्याचे काम करण्याचे आदेश दिले.

तक्रारदाराने दूरचित्रवाहिनीच्या शोविरुद्ध केलेल्या तक्रारीची न्यायालयात चर्चा होती. याबाबतचा निर्णय अखेर न्यायालयाने शुक्रवारी जाहीर केला.

तक्रारदाराची तोतयागिरी गंभीर चिंतेची बाब!

संबंधित तक्रार केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या बातम्या आणि मतांवर आधारित होती. खोट्या ओळखीखाली अशी फालतू तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारदाराने दिलेल्या स्पष्टीकरणावर आम्ही समाधानी नाही. हे कृत्य दुर्भावनापूर्ण हेतूने किंवा कदाचित एखाद्या प्रतिस्पर्ध्याच्या इशाऱ्यावर केले गेले आहे असे दिसते. तक्रारदाराची तोतयागिरी गंभीर चिंतेची बाब आहे. ती न्याय प्रशासनात जाणूनबुजून अडथळा आणणारी आहे, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in