

मुंबई : बलात्काराचा आरोप असलेल्या लंडनमधील व्यावसायिकाचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. त्यासंदर्भात एक घोषणापत्र आधीच जारी करण्यात आले आहे. अशा स्थितीत फरार आरोपी सामान्यतः अटकपूर्व जामीन मागू शकत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती माधव जामदार यांनी नोंदवले.
लंडनमध्ये व्यवसाय करीत असलेला प्रवीण कदम याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याच्या अर्जावर न्यायमूर्ती जामदार यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली.
कदम हा विवाहित असूनही त्याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्याच्या अर्जाची नोंद घेताना न्यायमूर्तीनी फरार आरोपींच्या जामीनासंबंधी हक्काबाबत भाष्य केले. फरार आरोपी सामान्यतः अटकपूर्व जामीन मागू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.