मुंबईवर अवकाळी पावसाचा 'स्ट्राइक'! १०० हून अधिक झाडे पडली; मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेही विस्कळीत, वाहतुकीचा बोजवारा

बुधवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने मुंबईला झोडपून काढले. संध्याकाळच्या सुमारास सुस्साट वारा आणि मुसळधार पावसाने मुंबईवर ‘स्ट्राइक’ केला.
मुंबईवर अवकाळी पावसाचा 'स्ट्राइक'! १०० हून अधिक झाडे पडली; मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेही विस्कळीत, वाहतुकीचा बोजवारा
Published on

मुंबई : बुधवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने मुंबईला झोडपून काढले. संध्याकाळच्या सुमारास सुस्साट वारा आणि मुसळधार पावसाने मुंबईवर ‘स्ट्राइक’ केला. त्यामुळे मुंबईत १०० हून अधिक ठिकाणी झाडे आणि झाडाच्या फांद्या पडल्याची घटना घडली. तर काही ठिकाणी इमारती, झोपड्यांवरील पत्रे उडून गेले. मुंबईला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे रेल्वे वाहतूकीसह रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला.

दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रँटरोड ते मरीन लाईन्सदरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे तसेच झाडांची फांदी पडल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती. तर जोराच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिट उशिराने धावत होत्या. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला होते. परिणामी, दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई व उपनगरातील विविध रस्ते पावसामुळे वाहतूक कोंडीत सापडल्याचे पाहायला मिळाले.

ऐन उन्हाळ्यात मुंबईसह अन्य ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची उन्हाच्या झळांपासून सुटका झाली असली तरी अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. मुंबई परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी चिखल आणि पाणी साचण्याच्या घटना घडल्या.

तर चंदनवाडी स्मशानभूमी आणि बडा कब्रस्तान जवळून जाणाऱ्या गल्लीमध्ये झाडाची फांदी कोसळल्याची घटना घडली. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील काही तास मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. यासोबतच गडगडाटी वादळ आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी हवामान विभागाने नागरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in