गिरीश चित्रे/मुंबई
घाटकोपर छेडानगर येथे बेकायदा महाकाय होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर मुंबईतील १,३१० होर्डिंग्जची झाडाझडती घेण्याचे आदेश पालिकेच्या अनुज्ञापन विभागाला दिल्याचे पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले.
मुंबईत ४० बाय ४० फुटांचे होर्डिंग लावण्यासाठी पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून रितसर परवानगी दिली जाते. मात्र अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग उभारले जात असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून वेळोवेळी तपासणी करण्यात येते. घाटकोपर छेडानगर येथे रेल्वे हद्दीतील १२० बाय १२० फुटांचे बेकायदा होर्डिंग कोसळले आणि १४ जण दगावले. या घटनेनंतर मुंबईतील होर्डिंगची झाडाझडती घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील बेकायदा होर्डिंग पालिकेच्या रडारवर आले आहेत.
पुढील काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, दुर्घटना घडू नये, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. घाटकोपर छेडानगर येथील बेकायदा होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईतील होर्डिंग्सची झाडाझडती घेण्यात येणार असल्याचे गगराणी यांनी सांगितले. १२ जून २०१९ मध्ये चर्चगेट स्थानकाजवळ असलेले होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत ६२ वर्षीय व्यक्तीचा जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचीही आठवण यानिमित्ताने झाली.