
मुंबई : मुंबईतील मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. त्यानुसार मेट्रो व मोनो रेल्वेच्या एकूण ३१ स्थानकांलगत ई:स्वॅप बॅटरी स्टेशन सुरू होणार आहेत.
महामुंबई मेट्रोच्या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. त्यामुळे, मुंबई शहर भारतातील अग्रगण्य शहर ठरणार आहे.
एमएमआरडीएचे आयुक्त आणि महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष, डॉ. संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमएमओसीएलच्या २९व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे धोरण मंजूर करण्यात आले. होंडाने त्यांची ई-स्वॅप सिस्टीम बसविण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रणालीद्वारे इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचे वापरकर्ते त्यांच्या चार्ज संपलेल्या होंडा मोबाइल पॉवर पॅक ई बॅटरीऐवजी दुसरी पूर्ण चार्ज केलेली बॅटरी केवळ दोन मिनिटांत घेऊ शकतात.
बॅटरी इन्स्टॉलेशन करताना सुरक्षा, तांत्रिक आणि पर्यावरणासंदर्भातील निकषांचे काटेकोर पालन करण्यात येणार असून दररोज ईव्ही वापरणाऱ्यांसाठी, डिलिव्हरी एजंट्स आणि फ्लीट ऑपरेटर्ससाठी सोपा ॲक्सेस व वापर सुलभतेची खात्री करण्यात येणार आहे.
इथे असेल सुविधा
-मेट्रो ७ मार्गिका (लाल मार्गिका) : गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, देवी पाडा, राष्ट्रीय उद्यान
-मेट्रो २ए मार्गिका ( पिवळी मार्गिका) : दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, एक्सर, बोरिवली पश्चिम, शिंपोली, कांदिवली पश्चिम, डहाणूकरवाडी, मालाड पश्चिम, लोअर मालाड, बांगूर नगर, ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी पश्चिम