

प्रणाली लोटलीकर
मुंबई : चुनाभट्टी येथे २४ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या एका गुन्हेगारी टोळीच्या गोळीबारात भरधाव सुटलेली गोळी आठ वर्षांच्या मुलीला लागली. त्या गोळीमुळे तिच्या हाताला कायमचे व्यंग आले आहेत. त्यामुळे तिला मुख्यमंत्री जनकल्याण निधीतून नुकसानभरपाई देण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने मुंबई उपनगर प्रशासनाला दिले आहेत.
अपंगत्वविषयक कल्याणकारी योजनेअंतर्गत या मुलीला आर्थिक मदतीचा अर्ज करण्यासाठी मदत करण्याचे निर्देश आयोगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. या योजनेद्वारे अपंगत्वाच्या प्रमाणानुसार लाभार्थी १८ वर्षांची होईपर्यंत दरमहा २ हजार २५० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. दरम्यान, पीडितेची बाजू मांडणारे वकील हितेंद्र गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाने ३८ लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी केल्याची माहिती आयोगाला दिल्यानंतर हे निर्देश देण्यात आले .
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची
पीडितेचे वडील सलून (केशकर्तनालय) चालवून आपला उदरनिर्वाह करत असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याकडे आयोगाने लक्ष वेधले. मुलीची परिस्थिती आणि कुटुंबाच्या स्थितीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश आयोगाने नेहरू नगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्तांना दिले आहेत, तसेच तिचे वय, दुखापती, अपंगत्व प्रमाणपत्र आणि वैद्यकीय खर्चाशी संबंधित कागदपत्रे गोळा करण्यास सांगितले आहे.