जी-२० परिषदेसाठी मुंबई सजली! प्रतिनिधींच्या चवदार आणि शाही मेजवानीवर ८ लाखांचा खर्च

आमरस, पुरणपोळी, अळूवडी, पाणी पुरी, मिसळ, पावभाजी, मोदक असा महाराष्ट्रीयन व काँटीनेंटल पदार्थाचा आस्वाद घेता येणार
जी-२० परिषदेसाठी मुंबई सजली! प्रतिनिधींच्या चवदार आणि शाही मेजवानीवर ८ लाखांचा खर्च
Published on

मुंबईत तीन दिवसीय जी २० परिषदेला येणाऱ्या विदेशातील प्रतिनिधींचे जंगी स्वागताची तयारी मुंबई महापालिका प्रशासनाने केली. २३ मे रोजी पालिका मुख्यालयात येणाऱ्या परिषदेच्या प्रतिनिधींना पंचतारांकित ट्रीटमेंट मिळणार असून आमरस, पुरणपोळी, अळूवडी, पाणी पुरी, मिसळ, पावभाजी, मोदक असा महाराष्ट्रीयन व काँटीनेंटल पदार्थाचा आस्वाद घेता येणार आहे. या एक दिवसाच्या शाही मेजवानीवर तब्बल ८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये मुंबईत जी-२० परिषद संपन्न झाली होती. यावेळी ही मुंबई नटली. त्यानंतर मार्च २०२३मध्ये जी-२० परिषद संपन्न झाली होती. आता पुन्हा एकदा जी-२० परिषदेचे आयोजन मुंबईत २३ ते २५ मे दरम्यान केले आहे. देशविदेशातील प्रतिनिधी जी-२० परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मुंबईत तिसऱ्यांदा जी-२० परिषद होत असून २३ मे ला देशविदेशातील प्रतिनिधी मुंबई महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक करणार आहेत. देशविदेशातील प्रतिनिधींचे जंगी स्वागत करण्यासाठी पालिका मुख्यालयात सजले असे नाही, तर मुंबईतील विशेष करुन दक्षिण मुंबईतील रस्ते चकाचक व खड्डे मुक्त झाले आहेत. उद्यानांच्या दुतर्फा शोभिवंत झाडे, रंगरंगोटी करण्यात येत आहे. तसेच २,२०० कोटी रुपये खर्चून मुंबईच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. त्यात २३ ते २५ मे दरम्यान जी-२० परिषद मुंबईत होत असल्याने पुन्हा एकदा मुंबई चकाचक झाली आहे.

जी-२० परिषदेचे २५० हून अधिक प्रतिनिधी मुंबई महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक करणार आहेत. पालिका मुख्यालयात येणाऱ्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. पालिका मुख्यालयात रंगरंगोटीची कामे सुरु असून मुख्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे मुंबईत नेहमीच जी-२० परिषद संपन्न झाली पाहिजे, असे मत मुंबईकर व्यक्त करत आहेत.

या पदार्थांची मेजवानी

आमरस, पुरणपोळी, आळूवडी, पाणी पुरी, मिसळ, पावभाजी, सरबत

युरोपीय पदार्थ

पास्ता, फिश , चिकन, बीफ, पोर्क मिन्स आणि भाज्या अन्नपदार्थ मुख्यत: ग्रिल असे पदार्थ असणार आहेत.

२५० प्रतिनिधींची व्यवस्था

पालिका मुख्यालयात २३ मे रोजी देशविदेशातील २५० हून अधिक प्रतिनिधी येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी तयारी अंतिम टप्प्यात असून त्यांच्या आवडीनुसार खाद्यपदार्थ असणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in