मुंबईच्या मुळावर विकास!

प्रदूषणाचा विषय आला की, जोरदार चर्चा होते. मात्र प्रत्यक्षात प्रदूषण नियंत्रणासाठी उपाय काय? आपले योगदान काय? याचा विचार कोणीच करत नाही.
मुंबईच्या मुळावर विकास!

- गिरीश चित्रे

प्रदूषणाचा विषय आला की, जोरदार चर्चा होते. मात्र प्रत्यक्षात प्रदूषण नियंत्रणासाठी उपाय काय? आपले योगदान काय? याचा विचार कोणीच करत नाही. गेल्या १० ते १५ वर्षांपासून वातावरणात मोठा बदल घडत आहे. वातावरणीय बदलांमुळे तापमानातही प्रचंड वाढ होत असून मुंबईत पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची लागवड करणे काळाची गरज झाली आहे. मात्र मुंबईत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या नावाखाली झाडांचा बळी दिला जात आहे. निसर्ग संतुलित नसेल तर आपणास ऑक्सिजन मिळणे कठीण होणार आहे. मुंबईसह देशाचा विकास हा प्रत्येकाला हवाच आहे. मात्र त्यासाठी झाडांचा बळी देणे म्हणजे आपणच आपल्या जीवाचे वैरी. त्यामुळे मुंबईचा विकास होणे अपेक्षित, पण मुंबईच्या मुळावर उठून विकास नको, हेही तितकेच खरे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत टाचणी पडली तरी त्याची जगभरात चर्चा होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. कोस्टल रोड, भूमिगत मेट्रो, बुलेट ट्रेन, तर भविष्यात नरिमन पॉइंट-विरार-अलिबाग-अटल सेतू मार्गे मुंबई अशी वाहतूक सेवा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. कमी वेळेत अधिकचा प्रवास चांगली गोष्ट आहे. मात्र या सगळ्यांत किती झाडांचा बळी दिला जाणार, याबाबत एकही चकार शब्द कोणी बोलत नाही. मुंबईत २९ लाख झाडांची हिरवळ ही ओरड अनेक वर्षांपासून कानी पडत आहे. याचा अर्थ मुंबईतील झाडांची संख्या कमी झाली किंवा झाडांची लागवड केलीच नाही. देशातील परिस्थिती बघितली तर पर्यावरणासारख्या प्रमुख मागणीवर सरकारदेखील गांभीर्याने घेत नाही. प्रदूषणास कारणीभूत प्लास्टिक बंदी आजही कागदावरच. मुंबईतील नद्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यात सरकार असो वा मुंबई महापालिका अपयशी ठरत आहे. विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल अशीच सुरू राहिली, तर मात्र मृत्यूच्या दिशेने वाटचाल ही धोक्याची घंटा आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

मुंबई ही सात बेटांवर वसली असून मुंबई तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढली आहे. मुंबईत धुळीचे साम्राज्य नेहमीच असते. मुंबईत वाढते प्रदूषण हे झपाट्याने सुरू असलेल्या बांधकामांमुळे असा ठपका ठेवण्यात येतो. प्रदूषण वाढीस बांधकाम कारणीभूत आहे, तितकेच बदलते वातावरण आहेच. मुंबईत रोज ६ हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो, जमा होणाऱ्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट केले जाते. परंतु मुंबईत ठिकठिकाणी पडलेले डेब्रिज, घाणीचे साम्राज्य आणि बदलते वातावरण यामुळे मुंबईत खोकला, ताप, सर्दी हे आजार झपाट्याने पसरत आहेत. तसेच समुद्रात सांडपाणी सोडले जात असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेला दंड ठोठावला. तरीही बदलत्या वातावरणाला कोणीच गांभीर्याने घेतलेले नाही. मुंबईत मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीटचे रस्ते होत आहेत. मात्र सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे, याचा विचार कोणीच करत नाही. काँक्रीटच्या रस्त्यांमुळे जमिनीखाली पाणी झिरपत नाही आणि झाडांना पाणी मिळत नाही. यामुळे झाडांचा बळी याचप्रमाणे सिमेंट काँक्रीटचे रस्तेही प्रदूषणास कारणीभूत आहे, याचा विचार करणे गरजेचे झाले आहे.

मायानगरी मुंबई देशाची आर्थिक राजधानी. मुंबईत काहीही घडले तर त्याची चर्चा तर होणारच. प्रदूषणात वाढ हा प्रश्न वर्षानुवर्षे चर्चेत आहे. परंतु ठोस निर्णय करण्याबाबत ना राज्य सरकार ना मुंबई महापालिकेने तसदी घेतली. ना वाढत्या प्रदूषणाला मुंबईकरांनी गांभीर्याने घेतले. हिवाळ्यात प्रदूषणात वाढ होते आणि वर्षातून एकदा प्रदूषणाचा विषय चर्चेला येतो. प्रदूषणात वाढ हा प्रश्न हिवाळ्यासाठी मर्यादित नसून प्रदूषण वाढीमुळे आरोग्यासह अनेक गोष्टींवर परिणाम होतो. बांधकाम ठिकाणी नियमावली जारी केली. परंतु यासाठी कायमस्वरूपी नियमावली असणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी हरित क्रांती घडवून आणली तर अन् तर पृथ्वी जगेल. औद्योगिक क्रांतीमुळे सगळ्याचं क्षेत्रांत मानवी हस्तक्षेप वाढल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे जगातील जैवविविधता धोक्यात आली आहे. तिचे संवर्धन आणि जतन करणे आवश्यक आहे, याबाबत जगात जागरूकता निर्माण करण्यासाठी २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. जैवविविधता ही मानवी जीवनाचा आधार आहे. जगात सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे म्हटले जाते. वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेले पशु-पक्षी, कीटक, साप, पाण्यातील सजीव, वृक्षसंपदा यांचा प्रामुख्याने या जैवविविधतेत समावेश होतो आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी मुंबई महापालिकेने घेतलेला पुढाकार यातून बोध घेत झाडांचे संवर्धन करण्यासाठी आपणही पुढाकार घेणे काळाची गरज आहे.

झाडांचे पुनर्रोपण गुलदस्त्यातच

जागतिक वृक्षसंपदा म्हणून मुंबई महापालिकेला सलग तिसऱ्यांदा बहुमान मिळाला. वृक्षसंपदा हा बहुमान मुंबई महापालिकेला मिळाला म्हणजे मुंबईचा अभिमान वाढणारच. प्रकल्पाच्या नावाखाली झाडे कापण्यास मुंबई महापालिका रितसर परवानगी देते. झाडे कापल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी झाडांचे पुनर्रोपण करा, असेही परिपत्रकात नमूद केले आहे. मात्र एखाद्या ठिकाणी झाडांची कापणी केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी झाडांचे पुनर्रोपण होते का हे गुलदस्त्यातच आहे. झाडांचा ऱ्हास असाच सुरू राहिला तर मात्र पृथ्वीवरील सजीवसृष्टी दृष्टीस पडणार नाही आणि याला तुम्ही-आम्ही सगळेच जबाबदार असणार आहोत.

logo
marathi.freepressjournal.in