

मुंबई : करचुकवेगिरी केल्याप्रकरणी मुंबई, पुण्यासह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये असलेल्या रामी ग्रुप ऑफ हॉटेल्सवर मंगळवारी इनकम टॅक्स विभागाच्या इन्व्हेस्टिगेशन विंगने मोठी छापेमारी केली. सकाळपासून सुरू झालेल्या छापेमारीत मुंबईसह १० शहरांमधील ३० हून अधिक ठिकाणी सर्च करण्यात आले. यामध्ये ग्रुपच्या प्रमुख हॉटेल प्रॉपर्टीज, प्रोमोटर्सशी संबंधित कार्यालये तसेच संस्थापक वर्दराज मंजनप्पा शेट्टी ऊर्फ राज शेट्टी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी निगडित ठिकाणांचा समावेश होता.
रामी ग्रुपशी संबंधित काही संस्थांकडून करचुकवेगिरी झाल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांतील आयटी विभागाची ही सर्वात मोठ्या ऑपरेशन्सपैकी एक मानली जात आहे. ग्रुपची कॉर्पोरेट ऑफिसेस, हॉटेल प्रॉपर्टीज आणि व्यवसाय भागीदारांशी संबंधित आस्थापनांचा यामध्ये समावेश आहे. दिवसभर या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाजवळील रामी हॉटेल व पुण्यातील अप्टे रोडवरील रामे ग्रँड हॉटेल येथे आयटी टीमने सखोल तपासणी केली. याशिवाय बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, उदयपूर आणि गोवा येथेही विभागाची कारवाई झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, आयटी विभाग ग्रुपच्या भांडवली स्रोतांची, कर्ज रचना तसेच प्रोमोटर स्तरावरील आर्थिक कागदपत्रांची तपासणी करत आहे, जेणेकरून कर नियमांचे पालन झाले आहे की नाही, हे निश्चित करता येईल.
मुंबईतील लोकप्रिय नाइटलाइफ ब्रँडचे मालक
रामी ग्रुप मुंबईतील बॉम्बे अड्डा यांसारख्या लोकप्रिय नाइटलाइफ आणि हॉस्पिटॅलिटी ब्रँड्सचे संचालन करतो. भारतात त्यांची ५२ हॉटेल्स आहेत, ज्यामध्ये चार-स्टार आणि फायव्ह-स्टार श्रेणीतील अनेक प्रॉपर्टीज आहेत. आयटी विभाग हॉटेलचे उत्पन्न, प्रॉपर्टी खरेदी, फ्रँचायझी कामकाज, इव्हेंट-आधारित व्यवसाय आणि डिजिटल व्यवहार यांची सविस्तर तपासणी करत आहे. रामी ग्रुपचे मालक वर्दराज शेट्टी दुबईतील टॉप १०० उद्योगपतींपैकी एक मानले जातात. ग्रुपकडे भारत आणि यूएईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीज असून हॉस्पिटॅलिटी, नाइटलाइफ आणि इव्हेंट व्यवसायात जलद विस्तार केला आहे.