Mumbai : जोगेश्वरी टर्मिनस थेट मेट्रो आणि स्कायवॉकने जोडणार; पश्चिम रेल्वे आणि MMRDA ची योजना

जोगेश्वरी कोचिंग टर्मिनसवर येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांना आता थेट मुंबई मेट्रो सेवेचा लाभ घेता येणार आहे. पश्चिम रेल्वे आणि एमएमआरडीएद्वारे या नवीन टर्मिनसला मेट्रो लाइन ६ आणि ७-ए शी जोडण्याची योजना अंतिम टप्प्यात आली असून यामुळे प्रवाशांना एकात्मिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

अभिषेक पाठक/मुंबई

जोगेश्वरी कोचिंग टर्मिनसवर येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांना आता थेट मुंबई मेट्रो सेवेचा लाभ घेता येणार आहे. पश्चिम रेल्वे आणि एमएमआरडीएद्वारे या नवीन टर्मिनसला मेट्रो लाइन ६ आणि ७-ए शी जोडण्याची योजना अंतिम टप्प्यात आली असून यामुळे प्रवाशांना एकात्मिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

या प्रस्तावानुसार, जोगेश्वरी टर्मिनसला राम मंदिर रेल्वे स्थानकाशी जोडणारा एक स्कायवॉक उभारण्यात येणार आहे, जो पुढे प्रवाशांना थेट गोरेगाव मेट्रो स्थानकापर्यंत जोडेल. लांब पल्ल्याच्या गाड्या, उपनगरीय लोकल रेल्वे आणि मेट्रो नेटवर्क यांच्यात अखंड कनेक्टिव्हिटी निर्माण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून मुंबईच्या पश्चिम उपनगरातील 'लास्ट माइल' (अंतिम टप्प्यातील) कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

टर्मिनसचे काम वेगात

जोगेश्वरी स्थानकाजवळ या नवीन कोचिंग टर्मिनसचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तीन प्लॅटफॉर्म विकसित केले जात असून भविष्यातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता आणखी दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्मची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या

सुलभ वावरासाठी ६ मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल बांधण्यात येत आहेत. ज्येष्ठ, महिला व दिव्यांगांसाठी सरकते जिने व लिफ्टची सुविधा आहे. दरम्यान, मल्टिमोडल इंटिग्रेशनवर भर देण्यात आला असून गोरेगाव मेट्रो आणि राम मंदिर रेल्वे स्थानक यांच्यात थेट जोडणी निर्माण करण्याचा एक स्वतंत्र प्रस्तावही विचाराधीन आहे.

२०२७ पर्यंत सेवा सुरू होणार

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२७ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर जोगेश्वरी हे मुंबईतील एक प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून उदयास येईल; जिथे लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल ट्रेन आणि मेट्रो सेवा एकाच छताखाली येतील. या प्रकल्पामुळे प्रवाशांची सोय तर होईलच, सोबतीला मुंबईच्या वाढत्या वाहतूक गरजांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in