Mumbai : जुहूमध्ये फटाक्यांच्या वादातून तरुणाची हत्या

जुहू येथे बुलेट मोटारसायकलजवळ फटाके फोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून १९ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mumbai : जुहूमध्ये फटाक्यांच्या वादातून तरुणाची हत्या
Mumbai : जुहूमध्ये फटाक्यांच्या वादातून तरुणाची हत्याप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मेघा कुचिक

जुहू येथे बुलेट मोटारसायकलजवळ फटाके फोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून १९ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी अवघ्या पाच तासांच्या आत कारवाई करत दोघा जणांना अटक केली असून एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. ८ नोव्हेंबरला रात्री ११ वाजताच्या सुमाराला ही घटना घडली.

पीडित तरुण नानू ऊर्फ शुभंकर मुकिया हा तक्रारदार आणि इतर चार मित्रांसोबत समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने चालला होता. विलेपार्ले पूर्व येथील सहकार भंडाराजवळील व्ही. एम. रोडवर पोहोचल्यावर पीडित तरुणाने एका पार्क केलेल्या बुलेट मोटारसायकलजवळ फटाके फोडले. यावरून दोन्ही बाजूत बाचाबाची आणि शिवीगाळ झाली. या वादाचा राग आल्यामुळे मुख्य आरोपीने आपल्या दोन साथीदारांना बोलावून घेतले.

तक्रारदार आणि त्यांचे मित्र संनिध्य बिल्डिंगजवळ पोहोचले असता आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. या मारहाणीत मुकियाचा मृत्यू झाला तर अन्य एक तरुणही जखमी झाला. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले.

एका अल्पवयीन मुलाला अटक

घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन जुहू पोलिसांनी तात्काळ अनेक पथके तयार करून तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या पाच तासांत तिन्ही संशयितांचा शोध घेऊन त्यांना पकडले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राहुल मंडाल (२३) आणि रवीकुमार देवेंद्र (२२, दोघेही रा. नेहरूनगर, विलेपार्ले पश्चिम) अशी पटली असून या प्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. जुहू पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)