Mumbai : दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार

मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. या घटनेनंतर इमारतीबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Mumbai : दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार
Published on

मुंबई : मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. या घटनेनंतर इमारतीबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

जुहू परिसरात असलेल्या नऊ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रात्री सुमारे १२.४५ वाजता हल्लेखोरांनी गोळीबार केला. किमान पाच गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यापैकी एक गोळी इमारतीतील जिमच्या काचेवर लागली. ही घटना घडली तेव्हा रोहित शेट्टी घरात उपस्थित होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुहू पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. दरम्यान, न्यायवैद्यक पथकही हल्ल्याचे पुरावे गोळा करत आहेत.

पुण्यात चार जण ताब्यात

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांनी रविवारी चार जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी पुणे शहरातील कर्वेनगर आणि धायरी भागातून चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, वारजे मालवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. घटनेनंतर पुरावे गोळा करण्यासाठी न्यायवैद्यक आणि बॅलिस्टिक्स तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तसेच शस्त्र कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in