Mumbai : काळा घोडा सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; खुल्या वातावरणात जेवणाचा आस्वाद; आकर्षक शिल्प, रंगीत भित्तीचित्रे

जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलाकारांनी साकारलेली सुंदर शिल्पे, रंगीत भित्तीचित्रे, ‘अल फ्रेस्को’ डायनिंगच्या सुविधेमुळे पर्यटकांना खुल्या वातावरणात जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. प्रतिष्ठित काळा घोडा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या महिन्यात त्याचे अनावरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Mumbai : काळा घोडा सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; खुल्या वातावरणात जेवणाचा आस्वाद; आकर्षक शिल्प, रंगीत भित्तीचित्रे
Mumbai : काळा घोडा सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; खुल्या वातावरणात जेवणाचा आस्वाद; आकर्षक शिल्प, रंगीत भित्तीचित्रे
Published on

मुंबई : जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलाकारांनी साकारलेली सुंदर शिल्पे, रंगीत भित्तीचित्रे, ‘अल फ्रेस्को’ डायनिंगच्या सुविधेमुळे पर्यटकांना खुल्या वातावरणात जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. प्रतिष्ठित काळा घोडा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या महिन्यात त्याचे अनावरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दगडी फरसबंदी असलेले पादचारी मार्ग यांसारखी नागरी कामे पूर्ण झाली आहेत, तर परिसराचे सांस्कृतिक आकर्षण वाढवण्यासाठी रंगीत भित्तीचित्रे आणि कलात्मक स्थापत्य (स्ट्रीट आर्टिफॅक्ट्स) बसवण्यात आली आहेत, अशी माहिती भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दिली.

या प्रकल्पांतर्गत काळा घोडा परिसरातील व्ही. बी. गांधी मार्ग (फोर्ब्स स्ट्रीट), रोपवॉक लेन, साईबाबा रोड, रदरफिल्ड स्ट्रीट आणि बी. भरूचा रोड या अंतर्गत रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यांवर शनिवारी आणि रविवारी पादचारी मार्ग (पेडेस्ट्रियन झोन) असेल. त्यासाठी येथे हायड्रॉलिक बोलार्ड्सही बसवण्यात आले आहेत. मकरंद नार्वेकर यांनी शनिवारी या कामाची पाहणी केली. “ग्लास्गोमधील बुकॅनन स्ट्रीट आणि लंडनमधील कार्नबी स्ट्रीट यांचा आदर्श घेऊन पालिकेने काळा घोडा परिसरातील चार रस्ते पादचारी मार्ग म्हणून विकसित करण्याची योजना आखली आहे. सुरुवातीला आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी हा परिसर पूर्णपणे पादचारी क्षेत्र असेल आणि पुढे सर्व दिवसांसाठीही हा निर्णय लागू करण्याची योजना आहे. ज्यामुळे परिसर अधिक सुरक्षित आणि पर्यटकांचे आकर्षण बनेल,” असे नार्वेकर यांनी सांगितले.

विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात भूमिगत पार्किंगची सुविधा उभारण्यात येणार आहे. या उपक्रमामागील कल्पना म्हणजे, लोकांनी या परिसरातील कला अनुभवावी, वाहनांचे, गर्दीचे दृश्य पाहू नये. प्रस्तावित पार्किंग सुविधेत १५० ते २०० गाड्यांची क्षमता असेल, असे नगरसेवक मकरंद नार्वेकर म्हणाले. या प्रकल्पातील विशेष आकर्षण म्हणजे सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलाकारांनी तयार केलेली चार सुंदर शिल्पे आहेत.

स्थानिक रहिवाशांनी केली कलाकृतींची निवड

परिसरात बसवण्यात आलेल्या कलाकृतींची निवड स्थानिक रहिवाशांनी केली आहे. काळा घोडा हे मुंबईचे कला केंद्र म्हणून ओळखले जाते आणि त्याचा वारसा जपत परिसरातील कोपरे आकर्षक बनवण्याचा उद्देश होता. कलाकारांनी अनेक डिझाईन्स सुचवली होती, त्यापैकी आम्ही चार निवडली. उदाहरणार्थ, टोपलीवर बसलेल्या कोंबडीचे शिल्प निवडले कारण असे दृश्य मुंबईत क्वचितच पाहायला मिळते. पुढे आम्ही कलाकारांना कचऱ्यातील वस्तूंचा पुनर्वापर करून कलाकृती तयार करण्यास प्रोत्साहन देणार आहोत, असे कुलाबा येथील रहिवासी बेला शहा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in