Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

ठाणे–कल्याण हा १०.८ किमीचा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेसाठी डोकेदुखी ठरत आहे. जागेअभावी नवीन ट्रॅक टाकणे हे मोठे आव्हान बनले आहे. डोंबिवलीसारख्या दाट वस्तीच्या भागांमध्ये जमिनीवर नवीन ट्रॅकसाठी जागा उपलब्ध नसल्याने...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईच्या उपनगरी रेल्वेतील सर्वात गजबजलेल्या ठाणे–कल्याण मार्गावरील वाढत्या गर्दीवरील उपाययोजनेसाठी मध्य रेल्वेने पर्यायांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे-कल्याण हा १०.८ किमीचा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रस्तावित ७वी आणि ८वी रेल्वे लाईन उभारणीदरम्यान काही भागात थेट भुयारी (अंडरग्राउंड) रेल्वे मार्ग टाकण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन आहे.

१०.८ किलोमीटर लांबीचा ठाणे-कल्याण रेल्वे पट्टा हा मध्य रेल्वेच्या सर्वात व्यस्त विभागांपैकी एक असून दररोज सुमारे १,००० गाड्यांची ये-जा याच मार्गावरून होते. मुंबई महानगर क्षेत्राच्या झपाट्याने होत असलेल्या विस्तारामुळे दररोज १२ ते १५ लाख प्रवासी या मार्गावर अवलंबून आहेत. मात्र, जागेअभावी नवीन ट्रॅक टाकणे हे मोठे आव्हान बनले आहे.

डोंबिवली परिसरात भुयारी मार्ग?

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डोंबिवलीसारख्या दाट वस्तीच्या भागांमध्ये जमिनीवर नवीन ट्रॅकसाठी जागा उपलब्ध नसल्याने भुयारी रेल्वे लाईन हा व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून स्वतंत्र तांत्रिक संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून संबंधित संस्था ‘फायनल लोकेशन सर्वे’ (FLS) करत आहे. या सर्व्हेमधून नवीन रेल्वे लाईनचा अचूक मार्ग, ट्रॅकची स्थिती, तसेच पूल, बोगदे आणि इतर अभियांत्रिकी कामांचे तपशील निश्चित केले जाणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “FLS अभ्यासाला काही आठवडे झाले आहेत. सध्या पहिल्या टप्प्यात आम्ही अत्यंत गजबजलेल्या कल्याण–ठाणे मार्गावरील नव्या लाईनच्या शक्यतांचा अभ्यास करत आहोत. काही भागांत जमिनीवर विस्तार शक्य आहे. मात्र डोंबिवलीच्या आधी आणि नंतरच्या काही पट्ट्यांमध्ये जागेची मोठी अडचण असून, तिथे भूमिगत मार्गाचा पर्याय गांभीर्याने तपासला जात आहे. FLS अहवाल २०२६ च्या मध्यापर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे."

५वी-६वी लाईन पण समस्या तशीच, दिवा स्थानकाची कोंडी कायम

ठाणे स्टेशनवरून पनवेलकडे जाणारा ट्रान्स-हार्बर मार्ग, दिवा येथून रोहाकडे जाणारी लाईन आणि कल्याणहून कसारा व कर्जत-खोपोलीकडे जाणारे मार्ग फुटतात. त्यामुळे ठाणे–कल्याण हा संपूर्ण सेंट्रल रेल्वेचा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विभाग मानला जातो. सध्या या मार्गावर फास्ट आणि स्लो अशा सुमारे १,२०० लोकल फेऱ्या दररोज धावतात. विशेषतः दिवा स्थानकावर ८९४ पैकी तब्बल ७० ते ७५ टक्के लोकल गाड्या थांबत असल्याने मोठी कोंडी निर्माण होते. परिणामी, दिवा येथील लेव्हल क्रॉसिंग दिवसाला सुमारे ३९ वेळा बंद ठेवावे लागते. प्रत्येक वेळी ३ ते ५ मिनिटे वाहतूक थांबते. रस्ते वाहतूक वाढल्यास रेल्वे गाड्यांनाही १०–१५ मिनिटे थांबावं लागतं, ज्याचा थेट परिणाम वेळापत्रकावर होतो. मध्य रेल्वेने २०२२ मध्ये ठाणे–दिवा दरम्यानची बहुप्रतिक्षित ५वी आणि ६वी लाईन पूर्ण केली होती. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी वाढत्या लोकसंख्येमुळे आणि प्रवासीसंख्येमुळे ही उपाययोजना अपुरी ठरत असल्याचे रेल्वे अधिकारी मान्य करत आहेत. विशेषतः डोंबिवलीच्या आधी आणि नंतरचा पट्टा अजूनही मोठ्या अडचणीचा ठरत आहे.

LTT आणि परळ टर्मिनससाठी मोठा प्लॅन

ठाणे–कल्याण मार्गावरील भुयारी आणि उंचावरील (एलिव्हेटेड) लाईन्सचा प्रस्ताव हा केवळ गर्दी कमी करण्यापुरता मर्यादित नसून, उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग वेगळे करण्याच्या व्यापक योजनेचा भाग आहे. मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारण्याची तसेच परळ येथे नवीन टर्मिनस विकसित करण्याचीही योजना आखत आहे, ज्यामुळे CSMT आणि दादरवरील ताण कमी होईल आणि लोकल व मेल/एक्सप्रेस गाड्यांचे स्वतंत्र संचालन शक्य होईल.

मुंबईकरांसाठी ‘गेमचेंजर’

भुयारी रेल्वे लाईनमुळे ठाणे–कल्याण मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होऊ शकतो. मात्र, नियोजन, मंजुरी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या सर्व टप्प्यांसाठी अजून अनेक वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही, हा प्रस्ताव भविष्यात मुंबईकरांसाठी ‘गेमचेंजर’ ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in