

अमित श्रीवास्तव /मुंबई
कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे महिनाभरापासून अंशतः कार्यरत असलेले केईएम रुग्णालयातील ‘वन स्टॉप सेंटर’ (ओएससी) पालिकेच्या हस्तक्षेपानंतर पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. या केंद्रात समुपदेशक आणि वकिलांसह सुमारे १० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे हिंसाचाराने पीडित महिलांसाठी समुपदेशन, कायदेशीर मदत, पोलीस साहाय्य आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधा पूर्ववत झाली आहे.
केईएममधील या केंद्रात पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्ध नसल्याने एका १९ वर्षीय अत्याचार पीडित तरुणीला तात्पुरत्या निवाऱ्यासाठी जोगेश्वरी येथील ‘वन स्टॉप वुमन सेंटर’मध्ये (ओएसडब्ल्यूसी) हलवण्यापूर्वी जवळपास पाच तास वाट पाहावी लागली होती. ‘द फ्री प्रेस जर्नल’ने ५ ऑगस्टला याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून ही बाब उघडकीस आणली होती. ‘द फ्री प्रेस जर्नल’ने ४ ऑगस्टला दुपारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पालिका प्रशासन हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी वेगाने पावले उचलत असल्याचे त्यांनी निश्चित केले.
एकाच छताखाली सर्व सुविधा
२०१२ च्या निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारच्या ‘मिशन शक्ती’ कार्यक्रमांतर्गत या ‘वन स्टॉप सेंटर’ची स्थापना करण्यात आली होती. हिंसाचार पीडित महिलांना वैद्यकीय उपचार, कायदेशीर मदत, मानसिक समुपदेशन, पोलीस सहाय्य आणि तात्पुरता आसरा अशा सर्व सुविधा एकाच छताखाली पुरवणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.
रुग्णालय प्रशासनाचे सर्व सहकार्य मिळणार
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी सांगितले की, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी (डीन) हे केंद्र सुरळीतपणे चालावे यासाठी रुग्णालय प्रशासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन दिले आहे. हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची बाब सर्वप्रथम निदर्शनाला आणून देणाऱ्या ‘मजलीस’ संस्थेच्या संचालक ॲडव्होकेट ऑड्रे डिसोझा यांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, समुपदेशक आणि वकिलांसह सुमारे १० कर्मचाऱ्यांची इथे नियुक्ती करण्यात आली आहे. हे केंद्र अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी मोठा आधार आहे. केंद्र पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते.
केंद्र पूर्वीप्रमाणेच कार्यरत होईल
समुपदेशकांच्या मानधनात भर घालणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) या प्रकल्पातून काढता पाय घेतल्यानंतर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण होऊन केईएममधील हे केंद्र संकटात सापडले होते. या अडथळ्यामुळे निवारा सेवेवर तर परिणाम झालाच, शिवाय केंद्रात येणाऱ्या प्रकरणांची संख्याही दरमहा १००-१२० वरून थेट ३०-४० पर्यंत खाली आली होती. आता कर्मचारी वर्ग पूर्ण झाल्यामुळे हे केंद्र पुन्हा पूर्वीसारख्याच क्षमतेने कार्यरत होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.